मनसेचे आमदार शरद सोनावणेंचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज ठाकरे यांच्या मनसेला आणखी एक जोरदार धक्का बसला असून जुन्नरचे मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे विधानसभेतील मनसेचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यापासूनच आमदार शरद सोनावणे पक्ष सोडणार,अशा चर्चा सुरू होत्या.अखेर त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत आज शिवबंधन हातात बांधून घेतले. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीआधी सोनवणे यांचा शिवसेनेत प्रवेश व्हावा, यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील प्रयत्नशील होते. पण शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा याला विरोध होता.
सोनावणे यांनी सांगितले की, खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचे मला निमंत्रण दिले होते. याबाबत मी मुख्यमंत्री फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कल्पना दिली होती. मनसे न सोडण्याची सूचना राज ठाकरे यांनी केली.मात्र ग्रामीण भागात मनसेचा प्रभाव नसल्याने मी माझ्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नव्हतो. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर मला शिवसेनेत घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या.सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे स्थानिक शिवसेना नेते मात्र नाराज झाले आहेत. जुन्नर विधानसभा मतदारसंघात आता शिवसेनेतर्फे सोनावणे उभे राहण्याची शक्यता असल्याने आमदारकीसाठी इच्छुक असलेले बुचके यांना आता तिकीट मिळणार नाही. त्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष आहे. विधानसभा निवडणुकीत मी मोठ्या मताधिक्याने निवडून येईन आणि युतीची सत्ता आल्यास तालुक्याच्या विकासासाठी मला पर्यटन मंत्रिपद मिळावे, अशी इच्छा सोनावणे यांनी व्यक्त केली आहे.