डॉ. अमोल कोल्हे यांना निवडणूक आयोगाचा दिलासा
मुंबई नगरी टीम
पुणे : शिरूर लोकसभा मतदारंसघातुन राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुक लढविणारे डॉ. अमोल कोल्हे यांना निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे. डॉ. कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका एका खासगी वाहिनीवर सुरू असून, डॉ. कोल्हे हे उमेदवार असल्यामुळे या मालिकेचे प्रक्षेपण थांबवावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने या मालिकेचे प्रक्षेपण रोखता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. खासगी वाहिन्यांच्या मालिकांवर कारवाई करणे अशक्य असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत.म्हणून ही मागणी करण्यात आली होती.मात्र कोल्हे यांनी या मालिकेवरून राजकारण केले जाऊ नये,असे आवाहन सुरूवातीला केले होते. पण ते कुणी मनावर घेतले नाही.या मालिकेमुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप केला जात आहे. निवडणूक आयोगाने या मालिकेवर दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल करावा आणि मालिकेचे प्रक्षेपण थांबवावे,अशी मागणी करण्यात आली होती.
यासंदर्भात पुणे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले की,बंदी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.कारण निवडणूक आयोगाच्या नियमानुसार केवळ दूरदर्शन या सरकारी वाहिनीवरील मालिकांवरच बंदी घालता येते.कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज भरला तरी सध्याच्या नियमानुसार मालिकेवर कोणतीही कारवाई करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ही तक्रार कुणी केली.आहे,हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.डॉ. अमोल कोल्हे यांनी आयोगाकडून यासंबंधी कोणतीही विचारणा झाली नसल्याचे सांगितले.कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे मालिका संकटात सापडणार,अशा चर्चा होत्या.कारण शिरूरमध्ये अटीतटीची लढत होत असून ही लढत जिंकायचीच,असा निर्धार राष्ट्रवादीने केला आहे. तर सलग तीन वेळा येथून निवडून गेलेले शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव यांनी पुन्हा विजय मिळवायचाच,असा पण केला आहे.