पर्रीकरांची चिता पेटत असताना सत्तासुरांनी शपथविधी उरकून घेतला

पर्रीकरांची चिता पेटत असताना सत्तासुरांनी शपथविधी उरकून घेतला

मुंबई नगरी टीम

मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये युती झाल्यानंतरही शिवसेनेने भाजपवर प्रखर टीका करण्याचे सुरूच ठेवले आहे.गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर मध्यरात्री नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी भाजपने उरकून घेतला. त्यावर शिवसेनेने मुखपत्रातून भाजपला जोरदार कानपिचक्या दिल्या आहेत.गोव्यात शिवसेना लोकसभेला रिंगणात आहे. म्हणूनही शिवसेनेने भाजपवर टीकास्त्र सोडले असण्याची शक्यता आहे.

शिवसेनेने म्हटले आहे की, पर्रिकरांच्या निधनानंतर गोव्यात जणू ‘रात्रीस खेळ चाले’या राजकीय मालिकेचे चित्रीकरण सुरु होते. पर्रिकर यांची चिता पेटत होती आणि सत्तातूर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती.चार तास तरी थांबायला हरकत नव्हती. पर्रिकरांच्या पार्थिवावर वाहण्यात आलेल्या फुलांचे अद्याप निर्माल्य झालेले नाही, पण बकासुराप्रमाणे सत्तासुरांची वखवख वाढल्याने रात्रीच्या अंधारात सर्व काही उरकून घेण्यात आले,अशी जहाल टीका शिवसेनेने केली आहे. सोमवार मध्यरात्रीऐवजी मंगळवारची सकाळ उजाडली असती तर गोव्यावर असा कोणता डोंगर कोसळणार होता?, असा सवालही शिवसेनेने अग्रलेखातून उपस्थित केला आहे.युती झाली असल्याने भाजप उद्धव ठाकरे यांची झोंबणारी टीका नेहमीप्रमाणे मुकाट राहून सहन करतो की तिखट उत्तर दिले जाते, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

 

 

Previous articleविषाची परिक्षा संपेल तेव्हा काही पक्ष संपलेले असतील
Next articleअनिल गोटे आणि शरद पवार भेटीने खळबळ