तासाभराच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । काही निर्णयांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू असतानाच आणि गेल्या दोन दिवसांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घेतलेल्या गाठीभेटीनंतर शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेवून सुमारे तासभर चर्चा केल्याने या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असले तरी या भेटीत महामंडळ वाटप,अध्यक्षपदाची निवडणूक आदी महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

काही निर्णयामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती.तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या घेतलेल्या गाठीभेटीनंतर आज दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी जावून पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेवून सुमारे तासभर अनेक विषयांवर चर्चा केली.या भेटीमुळे नाराजी नाट्यावर पडदा पडल्याचे सांगितले जात आहे. तर या बैठकीत महामंडळांच्या वाटपावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.पुढच्या आठवड्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणूकीबाबत चर्चा झाली असल्याची सांगण्यात येत आहे.राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने घटत असली तरी राज्यातील निर्बंध कडक करण्यात आल्याने जनतेमध्ये असलेली नाराजी याबाबतही या बैठकीत पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.या बैठकीपूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे सुद्धा वर्षावर उपस्थित होते.

Previous articleअटकेच्या भीतीमुळेच अनिल देशमुखांनी ईडीची चौकशी टाळली
Next articleखळबळजनक : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा