खळबळजनक : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा

मुंबई नगरी टीम

मुंबई । उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे याने पत्रात वसुलीचे गंभीर आरोप केले असून,सीबीआयतर्फे त्याची सखोल चौकशी करावी,अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

भाजपाच्या मुंबईत झालेल्या प्रदेश कार्यसमिती बैठकीत पक्षाने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब या मंत्र्यांची सीबीआय चौकशीची मागणी ठरावाद्वारे केली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री शाह यांना पत्र पाठवले आहे.उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवण्याबद्दल आरोपी असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझे याने एनआयए न्यायालयाला एप्रिल महिन्यात एक हस्तलिखित पत्र सादर केले होते.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने दर्शन घोडावत नावाच्या एका व्यक्तीने आपल्याला कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यास सांगितले तर परिवहनमंत्री अनिल परब यांनी आपल्याला मुंबई महापालिकेच्या पन्नास कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये तसेच सैफी ट्रस्टकडूनही खंडणी वसूल करण्यास सांगितले,असे गंभीर आरोप सचिन वाझे याने हस्तलिखित पत्रात केले आहेत.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी होत आहे. त्याचप्रमाणे अजित पवार,अनिल परब आणि दर्शन घोडावत यांच्या विरोधातील वाझेच्या पत्रातील आरोपांची सखोल सीबीआय चौकशी होणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

Previous articleतासाभराच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली ?
Next articleजेव्हा…खा.सुप्रिया सुळे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी कार्यकर्त्यांना कॉलबॅक करतात !