कल्याण, डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंचा झंझावाती प्रचार
मुंबई नगरी टीम
ठाणे : शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात जोरदार मुसंडी घेत झंझावाती प्रचार सुरू केला आहे. गुरुवारी कल्याण पूर्व येथे प्रचारफेरी दरम्यान त्यांनी कल्याणवासीयांशी संवाद साधत त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच, उल्हासनगर येथील मराठा सेक्शन येथे महाराणा प्रताप मित्र मंडळातर्फे भव्य खान्देश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी डोंबिवली पूर्व येथे डॉ. शिंदे यांनी झंझावाती प्रचार केला.
कल्याण पूर्व भागातील एफ केबिन फाटक, शिवाजी नगर, वालधुनी, बुद्धविहार, शिवाजी महाराज पुतळा, अंबरनाथ रोड, अशोक नगर गेट, पाठारे बुद्धविहार, उर्दू शाळा, कल्याण रोड, इंदिरा नगर, आंबेडकर चौक, रेल्वे कॉलनी या मार्गे डॉ. शिंदे यांच्या रोड शोचे आयोजन गुरुवारी संध्याकाळी करण्यात आले होते. शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे हजारो कार्यकर्ते या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. महिला आघाडी आणि मुस्लिम महिला देखील मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. भगव्या आणि निळ्या झेंड्यांनी कल्याण पूर्वेतील माहौल पुरता युतीमय झाला होता. श्रीकांत शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैंच्या घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर विनिता राणे, शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, माजी महापौर रमेश जाधव, राजेंद्र देवळेकर, शरद पाटील, प्रकाश पेणकर, दशरथ घाडीगावकर, महिला आघाडी जिल्हा संघटक विजया पोटे, महायुतीचे पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
शुक्रवारी डोंबिवली पूर्व येथील शिवसेना व भाजपच्या विविध नगरसेवकांच्या प्रभागात प्रचाराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. शिंदे यांनी यावेळी शैलेश धात्रक, विद्या म्हात्रे, रेखा म्हात्रे, विकास म्हात्रे, प्रकाश भोईर, वृषाली जोशी, गुलाब म्हात्रे, संगीता पाटील आदी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्या समवेत महापौर विनिती राणे, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, नगरसेवक विश्वनाथ राणे, भाजप सरचिटणीस नितीन ढवळे, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, रमेश म्हात्रे, भाजप डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रज्ञेश प्रभुघाटे, शिवसेना उपशहरप्रमुख संतोष चव्हाण, किशोर मानकामे आदी उपस्थित होते.
उल्हासनगर येथे आयोजित खान्देश महोत्सवात डॉ. शिंदे यांनी शेकडो उपस्थितांशी संवाद साधून उल्हासनगरच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. उल्हासनगरचे उद्योजक, व्यापारी यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. उल्हासनगर येथे सव्वाशे कोटी रुपयांच्या रुग्णालयाचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली. डॉ. शिंदे यांनी पहिल्याच टर्ममध्ये उत्तम काम केले असून त्यांनाच पुन्हा विजयी करण्याचा निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, दिपेश म्हात्रे, एल.बी. पाटील, राजेंद्र चौधरी, एन.टी. पाटील, आर.जे राजपुत, विजय ठाकुर आदी मान्यवर उपस्थित होते.