राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन

राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माळशिरस मतदारसंघातील विद्यमान आमदार हनुमंत डोळस यांचे आज  सकाळी मुंबईत उपचारादरम्यान  निधन झाले. त्यांच्या राहत्या मुळगावी दसूर  माळशिरस येथे उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हनुमंत डोळस यांच्या निधनामुळे  भरुन न निघणारी पोकळी पक्षात निर्माण झाली आहे.एक अभ्यासू, परखड वक्ता आणि मतदारसंघावर मजबुत पकड असलेला उमदा आमदार पक्षाने गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात पक्ष सहभागी आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.२००९ आणि २०१४ या दोन टर्म आमदार हनुमंत डोळस हे माळशिरस मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार राहिले आहेत. आमदार म्हणून त्याचे काम वाखाणण्याजोगे राहिले आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उभारणीमध्ये आमदार हनुमंत डोळस यांचे महत्वाचं योगदान राहिलेले आहे.

गेले काही महिने ते कर्करोगाने आजारी होते. त्यांच्यावर  सैफी रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवस त्यांनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिला असे डॉक्टरांचे म्हणणे होते. मात्र गेले काही दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. आज दुपारी १२. १५ वाजता त्यांची सैफी रुग्णालयात प्राणज्योत मालवली.त्यांच्या राहत्या मुळगावी दसूर – माळशिरस येथे उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Previous articleवसईत सत्ताबदल करून गुंडगिरी संपवा
Next articleआचारसंहिता शिथिल करण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी