आरक्षण प्रश्नी सरकारने मराठा विद्यार्थ्यांचाही बळी दिला : धनंजय मुंडे

आरक्षण प्रश्नी सरकारने मराठा विद्यार्थ्यांचाही बळी दिला : धनंजय मुंडे

मुंबई नगरी टीम

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षणासंदर्भातली राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टानेही फेटाळली आहे.  त्यामुळे यावर्षीची प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाच्या कायद्यानुसार होणार नाही. निवडणुकांच्या आश्वासनावर स्वार होताना सरकारने मराठा विद्यार्थ्यांचाही बळी दिला आहे अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

भाजपकडे कोणत्याच गोष्टीचा लाँग टर्म प्लान नसतो. मग त्यांच्या फसलेल्या योजना असोत किंवा नुकतेच जाहीर झालेले मराठा आरक्षण. निवडणुकांच्या अनुषंगाने आरक्षण जाहीर केले मात्र त्याची ठोस अंमलबजावणी सरकारला करता आली नाही. मेडिकलच्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला सरकारच जबाबदार आहे असा आरोप ही मुंडे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करून आपली याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 मुंडे यांनी टाईम मॅगझीनने पंतप्रधान मोदींबाबत लिहिलेल्या लेखावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न दाखवणाऱ्यांनीच देशाचे नाव धुळीस मिळवले आहे अशी टीका धनंजय मुंडे यांनी ट्विटर वरून केली आहे.अमेरिकेतील जगप्रसिद्ध असणाऱ्या टाईम मॅगझीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत लिहिलेल्या लेखामध्ये दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता असा उल्लेख करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी हिंदुत्वाचे राजकारण करत आहेत. त्यामुळे देशात ध्रुवीकरण झाले आहे. लोकप्रियतेमुळे कोलमडलेली लोकशाही म्हणून भारताचा उल्लेख करता येईल. असेही त्या लेखामध्ये म्हंटले आहे. याचबरोबर २०१४ पासून भारतामध्ये अनेक बदल झाले असल्याचेही त्यामध्ये म्हंटले आहे.

याच मुद्यावरून  मुंडे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. टाईम मॅगझीनने वेळोवेळी व्हीलन नंबर १ चा खरा चेहरा समोर आणला आहे. भारतातील खरी तुकडे तुकडे गँग आणि त्यांच्या प्रमुखाला जगासमोर आणण्यासाठी टाईमचे आभार. भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न दाखवणाऱ्यांनीच देशाचे नाव धुळीस मिळवले. असे ट्विट मुंडे यांनी केले आहे.

Previous articleदुष्काळी जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामांना तीन दिवसात मंजुरी द्या
Next articleमुंबई महानगरपालिका आयुक्तपदी प्रविण परदेशी