जनावरांना चारा की भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांना कुरण

जनावरांना चारा की भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांना कुरण

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्र भीषण दुष्काळाच्या संकटात असताना जनावरांना चारा उपलब्ध करुन देण्याच्या नावाखाली भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आयते कुरण उलपब्ध करुन देण्यात आले आहे. या कार्यकर्त्यांनी जनावरांची बोगस संख्या दाखवून करोडो रुपयांचे अनुदान लाटले आहे. सरकारचे अनुदान लाटणाऱ्या या घोटाळेबाजांवर तात्काळ कारवाई करावी,  अशी मागणी काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

राज्यातील चारा छावण्यांच्या घोटाळ्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की,मराठवाड्यात शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या स्वयंसेवी संस्था दाखवून मोठ्या प्रमाणावर चारा छावण्या सुरु केल्या व त्यातून करोडो रुपयांचे सरकारी अनुदान लाटले. चारा छावण्यामधून जनावरांची संख्या जास्त दाखवून मलिदा लाटण्यात आला. बीड जिल्हाधिकाऱ्यांनी चारा छावण्यांची तपासणी केली असता या छावण्यांमध्ये प्रत्यक्षात कमी प्रमाणात जनावरे दिसून आली, मात्र अनुदान जास्त जनावरांचे लाटण्यात आल्य़ाचे उघड झाले आहे.

बीड जिल्हाधिकाऱ्यांनी चारा छावण्यांवर अचानक केलेल्या कारवाईत १६ हजार जनावरे कमी आढळून आली. जनावरांची वाढीव संख्या दाखवून दिवसाला ७ लाख ते १४ लाख रुपयांचे सरकारी अनुदान लाटल्याचे यातून दिसून आले. अशाच पद्धतीने सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक चारा छावण्यांमध्ये जनावरांची संख्या बोगस दाखवून स्वतःचे उखळ पांढरे करुन घेतले आहे. बीड जिल्ह्यासह सर्व चारा छावण्यांचे ऑडीट केले तर हा घोटाळा यापेक्षाही मोठा असल्याचे समोर येईल. त्यामुळे सरकारने तातडीने चारा छावण्यांचे ऑडीट करुन सरकारी अनुदान लाटणाऱ्यांवर कारवाई करावी अशी, मागणी चव्हाण यांनी केली आहे.

Previous articleअंगणवाडी सेविका मदतनिसांच्या मानधन वाढीचा प्रश्न या अधिवेशनात मार्गी लावू 
Next articleहा तर राजकीय कट ; अभिजित बिचुकले उच्च न्यायालयात दाद मागणार