मुंबईतील पुलांच्या कामांचे कॅगकडून ऑडिट करणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने मागील ५ वर्षात केलेल्या सर्व पुलांची स्ट्रक्चरल ऑडीट, त्यांची दुरुस्ती, निविदा प्रक्रिया याबाबत कॅगकडून विशेष ऑडीट करणार का असा तारांकित प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. त्यावर तसे ऑडीट केले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ हिमालय पादचारी पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबतचा प्रश्न आज विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला होता. हा प्रश्न मर्यादित नाही तर हा सव्वा कोटी मुंबईकरांच्या जीवाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा प्रश्न असल्याचे मुंडे यांनी सांगितले.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पुल दुर्घटनेत निष्पापांना आपले प्राण गमवावे लागले. धड कार्यालय नसलेल्या डि. डि. देसाई या एकाच कंपनीला मुंबईतील ८२ पुलांच्या ऑडिटचे काम दिले. पोलिस अहवालानुसार पुलाच्या खालच्या भागाची तपासणी रस्त्यावर उभं राहून रिपोर्ट दिला गेला. त्यामुळेच ही दुर्घटना घडली असा आरोप मुंडे यांनी केला.
देसाई कंपनीने दिलेला अहवाल तपासण्याची जबाबदारी मनपा मुख्य अभियंता व उपायुक्तांची होती. त्यांच्या बेजबाबदारपणा मुळे तसे झाले नाही. त्यांच्यावर काय कारवाई करणार? त्यांना निलंबित करा अशी मागणी मुंडे यांनी केली.मुंबईतील रहिवासी प्रत्येक क्षण भीतीच्या वातावरणात जगत आहे. रेल्वे दुर्घटना, पुल दुर्घटना, झाडे कोसळून मुंबईकरांना नाहक जीव गमवावा लागत आहे. एल्फिन्स्टन पुल दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्री पियुष गोऐल यांनी ४२५ पुलांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्याचे काय झाले असा सवाल केला. याबाबत पुन्हा चौकशी करून दोषी असल्यास उपायुक्त यांना निलंबित करू असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.