पीक विमा कंपन्याविरुद्धचा मोर्चा म्हणजे शिवसेनेची निव्वळ नौटंकी
मुंबई नगरी टीम
मुंबई : शिवसेना सत्ताधारी पक्ष असूनही त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावता आलेले नाहीत. मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेचे मंत्री गप्प बसतात आणि बाहेर येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याची भाषा करतात ही केवळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरची त्यांची नौटंकी आहे, अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
शिवसेनेच्या मोर्चावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पांडुरंगाच्या दर्शनासाठी एकत्र येऊ शकतात तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र येऊन काम का करत नाहीत ? सत्ताधारी पक्षाने जनतेचे प्रश्न मार्गी लावायचे असतात, संबंधित यंत्रणेला आदेश देऊन त्याची अंमलबजावणी करून घ्यायची असते मात्र शिवसेनेचे सरकारमध्ये काहीही चालत नाही. म्हणूनच सत्ताधारी असूनही विरोधी पक्षासारखे मोर्चा काढणे, आंदोलने करण्याची भाषा त्यांना करावी लागते. शिवसेनेचा हा मोर्चा म्हणजे पुतणा मावशीचे प्रेम आहे.
शेतकरी कर्जमाफी योजनेतील सर्व ८९ लाख शेतकऱ्यांची यादी तपासून घेण्याची वल्गना शिवसेनेने केली होती, त्यानंतर बँकांसमोर ढोल बडवण्याची भाषाही केली होती, पण प्रत्यक्षात अजूनही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. शिवसेनेला कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांना जर शेतकऱ्यांचा कळवळा असता तर पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना नाडवत असताना सरकारी पातळीवरूनच त्यांचा ‘बंदोबस्त’ करता आला असता पण ते त्यांना शक्य नाही म्हणूनच ते मोर्चाचा स्टंट करत आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.
नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात पीक विम्यासंदर्भात मी मुद्दा उपस्थित केला होता, त्यावेळी बोलताना कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी, ज्या पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना तात्काळ मिळतील यात सरकार लक्ष घालेल तसेच पीक विमा मिळण्यात ज्या काही संस्थात्मक त्रुटी आहेत त्या दूर करून शेतकऱ्यांना लाभ मिळेल, असे आश्वासन बोंडे यांनी दिले होते, पण अजूनही त्याबाबत काहीही झालेले नाही याची आठवण वडेट्टीवार यांनी करून दिली. अनेक सरकारी बँका उद्दिष्टांच्या पन्नास टक्केही कर्ज वाटप करत नाहीत. कागदपत्रांच्या पूर्ततेचा बहाणा करून या बँका शेतकऱ्यांची अडवणूक करतात. सरकारचे निर्देश धाब्यावर ठेवून या सरकारी बँका शेतकऱ्यांची अडवणूक करतात, त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
सरकारच्या आशीर्वादाने पीक विमा कंपन्या शेतक-यांना नागवून मालामाल झाल्या आहेत आणि शेतकरी मात्र कंगाल झाला आहे. पण आतापर्यंत या मुजोर विमा कंपन्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. पीक विमा योजनेतून शेतकऱ्याची लूट सुरु असताना पाच वर्षे शिवसेना काय झोपा काढत होती काय? असा संतप्त सवालही वडेट्टीवार यांनी विचारला आहे.
शेतकऱ्यांबद्दल शिवसेनेला जर खरीच चिंता असती, त्यांच्या प्रश्नांची चाड असती तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे देण्याची फक्त भाषा केली नसती तर प्रत्यक्षात राजीनामे देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम केले असते, त्यांना न्याय मिळवून दिला असता. पण राजीनामे देण्याची त्यांची भाषाही नेहमीप्रमाणे हवेतच विरली. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शेतकऱ्यांची आठवण झालेली आहे. पण त्यांच्या या नौटंकीला आता शेतकरी भीक घालणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.