महाराष्ट्राच्या धरतीवर पडलेले पाणी अडविले तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त

महाराष्ट्राच्या धरतीवर पडलेले पाणी अडविले तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त

मुंबई नगरी टीम

नाशिक :  देवसाने- मांजरपाडा प्रकल्पाचा उद्देश यशस्वी होतांना पाहून मनस्वी आनंद होत असून महाराष्ट्राच्या धरतीवर प्रत्येक थेंब अडवून वळविला तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी महाराष्ट्राला मिळू शकते याचे उदाहरण म्हणजेच देवसाने-मांजरपाडा प्रकल्प असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या देवसाने मांजरपाडा प्रकल्पाचे जलपूजन मोठ्या उत्साहात त्यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात देवसाने मांजरपाडा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आणि आघाडी सरकारच्याच काळात जवळपास ९५ टक्के पूर्ण झाले होते. तसेच सरकारचा कार्यकाळ संपत असताना उर्वरित कामासाठी ७० कोटी रुपये मंजूर करून ठेवले होते. मात्र सरकार बदलल्याने सरकारने ते पैसे इतरत्र वळविले. त्यानंतर प्रसंगी अधिवेशनात सभागृहाच्या वेलमध्ये बसून ठिय्या मांडला तसेच त्यानंतर कारागृहातून पत्रव्यवहार करून सरकारचे लक्ष वेधले आणि बाहेर आल्यानंतर देखील त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला. त्यामुळे सरकारने उर्वरित खर्चाला मान्यता दिली. जर मंजूर केलेले पैसे इतरत्र वळविले नसते तर तीन वर्षांपूर्वी येवला, चांदवडला पाणी आले असते असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, आंध्र प्रदेश सरकारने कालेश्वरम प्रकल्प राबविला या प्रकल्पात ६५० मीटरहुन अधिक उंचीवर पाणी लिफ्ट केले आहे. त्याचप्रमाणे देवसाने मांजरपाडा प्रकल्पाकडे उदाहरण म्हणून बघावे आणि महाराष्ट्राचे गुजरातला वाहून जाणारे पाणी अडवून ते महाराष्ट्रात वळविले तर नाशिक जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातून गुजरातला वाहून जाणारे पाणी वळण बंधारे आणि बोगद्याद्वारे गोदावरी खोऱ्यात आणणारा राज्यातील हा एकमेव प्रकल्प आहे. तर १०.१६ किमी बोगद्याद्वारे पाणी वळवणारा हा पहिलाच प्रकल्प आहे. गुजरातमध्ये जाणारे पाणी आपण पूर्वेकडे वळवू शकतो त्याचे हे एक यशस्वी उदाहरण आहे. गुजरातला वाहून जाणारे पाणी आज ना उद्या उचलू पण पाण्याचा हक्क गुजरातला लिहून देऊ नका, यासाठी कितीही कर्ज काढावे लागले ते काढा त्यासाठी पक्षभेद विसरून एकत्र या आणि महाराष्ट्राच्या मातीवर पडणार प्रत्येक थेंब महाराष्ट्राला मिळवून द्या असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, देवसाने मांजरपाडा प्रकल्प माझ्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक प्रकल्प असून आज तो पूर्ण केला आहे. याचा मला मनस्वी आनंद आहे.

तसेच डोंगरगाव पुणेगाव दरसवाडी कालव्याचे अस्तरीकरण व विस्तारीकरण करण्यासाठी पाठपुरावा सुरू असून शासनाने लवकर यासाठी निधी उपलब्ध करून घ्यावा असे त्यांनी सांगितले. हा प्रस्ताव मार्गी लावून काम सुरु केल्यास आम्ही त्यांचे आभार व्यक्त करू असे भुजबळ म्हणाले. ज्या देवसानेसह परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्या स्थानिक शेतकऱ्यांचे त्यांनी आभार मानून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. जलसंपदा विभागाने आयोजित केलेल्या जलपूजन कार्यक्रमाबाबत बोलतांना ते म्हणाले की जलसंपदामंत्र्यांनी जलपूजनासाठी बोलावले असते तर आजचा कार्यक्रम घेण्याची गरज पडली नसती असे सांगून पाण्याच्या बाबतीत राजकारण करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी ‘वळचणीचे पाणी आढ्याला गेले’ हा संत एकनाथांचा अभंग गाऊन छगन भुजबळ यांच्या अथक प्रयत्नामुळे पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळाल्याने ते आधुनिक भगीरथ असल्याचे आ.नरहरी झिरवाळ यांनी आपल्या भाषणात सांगितले. दुष्काळी चांदवड व येवला तालुक्यांना  पाणी पोहचविण्याचे श्रेय त्यांनी भुजबळांना दिले. त्याचबरोबर दिंडोरी तालुक्यातील जनतेचा त्याग अधोरेखित करून स्थानिक शेतकऱ्यांना चारणवाडी धरणामध्ये १०० द.ल.घ.फु.पाणी राखीव ठेवण्याची मागणी त्यांनी केली. माजी आमदार धनराज महाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या जलपूजन सोहळ्यासाठी येवला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुक्याची झालर आणि आकाशातून पडणारा वरुण राजा अशा आल्हाददायक वातावरणाला शेतकऱ्यांच्या घोषणा आणि ढोल -ताश्यांची साथ लाभली होती. बोगद्यातून वाहणारे पाणी पाहून शेतकऱ्यांचे चेहरे खुलून गेले होते.

Previous article“सेवा आपल्या दारी” उपक्रमातंर्गत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानची टीम थेट रिक्षा चालकांपर्यंत
Next articleमुख्यमंत्री महोदय, क्या हुआ आपका वादा ?