या कारणामुळे अवधूत तटकरेंनी आमदारकीचा राजीनामा दिला !
मुंबई नगरी टीम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गळती सुरूच असून,राष्ट्रवादीचे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी राजीनामा दिला आहे.त्यांनी आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला.गेल्याच आठवड्यात अवधूत तटकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती.येत्या दोन दिवसात ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आणि श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीसोबतच तटकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर अवधूत तटकरे यांनी मातोश्रीवर जाऊन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.कोकणातील काही आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती मात्र गेल्याच आठवड्यात अवधूत तटकरे यांनी शिवसेना आमदार आणि म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची भेट घेवून चर्चा केली. त्यानंतर उदय सामंत यांनी तटकरे यांच्यासह मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून चर्चा केल्याने तटकरे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती . अवधूत तटकरे हे ३ सप्टेंबर रोजी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते.राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनीही उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने या दोन्ही नेत्यांचे पक्षप्रवेश एकाच वेळी होईल अशी शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणूकीत श्रीवर्धन मधून खासदार सुनील तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा असल्याने अवधूत तटकरे हे नाराज होते.रोहा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून खासदार सुनील तटकरे यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला होता. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे हा वाद संपुष्टात आला असतानाच श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे आणि त्यांचे वडील अनिल तटकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे.