अवधूत तटकरेंचा शिवसेनेत प्रवेश

अवधूत तटकरेंचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गळती सुरूच असून,राष्ट्रवादीचे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.तटकरे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तटकरे कुटूंबासह राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जाते.

दोनच दिवसापूर्वी आमदारकीचा राजीनामा दिलेले राष्ट्रवादीचे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर अवधूत तटकरे यांनी मातोश्रीवर जाऊन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती.कालच श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आज अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शिवसेनेने लागोपाठ धक्के दिल्याचे बोलले जाते. येत्या १३ सप्टेंबरला गुहागरचे राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव हे शिवेसेनेत प्रवेश करणार असल्याने पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ आता कोकणात राष्ट्रवादीला सुरूंग लागण्यास सुरूवात झाली आहे.आज अवधूत तटकरे यांच्यासोबत त्यांचे वडील माजी आमदार अनिल तटकरे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

आगामी विधानसभा निवडणूकीत श्रीवर्धन मधून खासदार सुनील तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा असल्याने अवधूत तटकरे हे नाराज होते.रोहा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून खासदार सुनील तटकरे यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला होता. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे हा वाद संपुष्टात आला असतानाच श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे आणि त्यांचे वडील अनिल तटकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने  सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू होती. आता अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने खासदार सुनिल तटकरे यांनाही हा धक्का असल्याची चर्चा आहे..

Previous articleपाच वर्षात ६० लाख रोजगार निर्मितीचा दावा खोटा व फसवा !
Next articleवैद्यकीय अध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू