अजित पवारांच्या विरोधात गोपीचंद पडळकरांना उमेदवारी

अजित पवारांच्या विरोधात गोपीचंद पडळकरांना उमेदवारी

मुंबई नगरी टीम

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे  काँग्रेसचे आमदार काशिराम पावरा यांच्यासह धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या दोन नेत्यांनी भाजपात प्रवेश केला.

गरवारे क्लब येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात धनगर समाजाचे नेते असलेले गोपीचंद पडळकर  आणि काँग्रेसचे आमदार काशिराम पावरा यांनी भाजपात प्रवेश केला.धनगर समाजाचे नेते असलेले गोपीचंद पडळकर यांना बारामती मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा विचार करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.गोपीचंद पडळकर यांनी स्वत:साठी कोणतेही पद न मागता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पडळकर हे लढाऊ कार्यकर्ते असून त्यांच्या सारख्या कार्यकर्त्यांचा योग्य तो मान राखला जाईल. पडळकर यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबतचा प्रस्ताव आपण भाजपा नेतृत्वाकडे मांडू असे मुख्यमंत्री म्हणाले.दिवसेंदिवस भाजपाची लोकप्रियता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा सामान्य जनतेचा विश्वास वाढतच आहे. गोपीचंद पडळकर हे काही काळ भाजपापासून दुरावले होते. मात्र, ते आता पक्षात परतले आहेत याचा आनंद आहे असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.काशिराम पावरा म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यांच्या योजनांना साथ देण्यासाठी आम्ही काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Previous articleराज ठाकरे ५ ऑक्टोबरला पहिली प्रचारसभा घेणार
Next articleवंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर