धो धो पावसात शरद पवार भाजप- सेनेवर बरसले!
मुंबई नगरी टीम
सातारा : सातारा येथील जाहीर सभेत वरुणराजाने तुफान हजेरी लावली असतानाही त्या भरपावसातही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप- सेनेवर शब्दांचा तुफानी मारा केला. त्यांच्या या भरपावसातील सभेने अख्ख्या सातारकरांची मन जिंकली.
आज सकाळी १० वाजता पंढरपूर आणि त्यानंतर अंबाजोगाईची सभा केल्यानंतर शरद पवार यांची साताऱ्यामध्ये संध्याकाळी सभा होती. सातारच्या या सभेत शरद पवार काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते.शरद पवार भाषणाला उभे राहिले आणि पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र त्या पावसातही पवार यांनी भाजप – सेनेला चांगलेच झोडपून काढले.उद्या होणाऱ्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला साक्षात वरुणराजाने देखील आशिर्वाद दिले आहेत. त्याच्या आशिर्वादाने सातारा जिल्हा महाराष्ट्रात चमत्कार करणार आहे आणि याची सुरुवात २१ तारखेपासून होणार आहे असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
एखाद्या माणसाकडून चुक झाली की, त्याने ती चुक कबुल करायची असते. लोकसभेच्या निवडणूकीमध्ये माझ्याकडून चुक झाली अशी जाहीर कबुली देतानाच साताऱ्याचा प्रत्येक माणूस ती चुक सुधारण्यासाठी २१ तारखेची वाट बघत आहेत अशी आशाही पवार यांनी व्यक्त केली.भरपावसात अवघी दहा मिनिटे शरद पवार यांनी भाषण केले मात्र त्यांच्या या भाषणानंतर जनतेच्या मनात एका वेगळया परिवर्तनाची झलक पाहायला मिळाली.