राज्यात सर्वाधिक मतदान या मतदार संघात झाले

राज्यात सर्वाधिक मतदान या मतदार संघात झाले

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले असून, सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे ६०.४६टक्के मतदान झाले. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अंदाजे ६४.२५ टक्के मतदान झाले आहे, या निवडणूकीत ग्रामिण भागात उत्साह तर शहरी भागात निरूत्साह पाहवयास मिळाला. राज्यात सर्वाधिक मतदान करवीर मतदारसंघात ८३.२० टक्के तर सर्वात कमी मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघात ४०.२० टक्के इतके झाले आहे.या निवडणूकीची मतमोजणी येत्या २४ तारखेला होणार आहे. त्यामुळे सर्वाधिक आणि कमी झालेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार हे याच दिवशी स्पष्ट होईल.

विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघासाठी मतदारांनी उत्साहाने मतदान केले.राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात ८३.२० टक्के झाले. त्याखालोखाल शाहूवाडी ८०.१९, कागल ८०.१३ टक्के, शिराळा ७६.७८ टक्के तर रत्नागिरी ७५.५९ टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघात ४०.२० टक्के इतके झाले. तर उल्हासनगरमध्ये ४१.२० टक्के, कल्याण पश्चिममध्ये ४१.९३ टक्के, अंबरनाथमध्ये ४२.४३ टक्के, वर्सोवा ४२.६६ टक्के आणि पुणे कँटोन्मेंटमध्ये ४२.६८ टक्के मतदान झाले.आजची मतदानाची आकडेवारी बघितली तर ग्रामिण भागात मतदानासाठी उत्साह तर शहरी भागात निरूत्साह पाहवयास मिळाला.

 राज्यातील जिल्हानिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे

अहमदनगर ६४.९३ टक्के, अकोला ५६.८८ टक्के, अमरावती ५९.३३, औरंगाबाद ६५.०६, बीड ६८.०३, भंडारा ६६.३५, बुलढाणा ६४.४१, चंद्रपूर ६३.४२, धुळे ६१.९०, गडचिरोली ६८.५९, गोंदिया ६४.०६, हिंगोली ६८.६७, जळगाव ५८.६०, जालना ६७.०९, कोल्हापूर ७३.६२, लातूर ६१.७७, मुंबई शहर ४८.६३, मुंबई उपनगर ५१.१७, नागपूर ५७.४४, नांदेड ६५.४०, नंदुरबार ६५.५०, नाशिक ५९.४४, पालघर ५९.३२, परभणी ६७.४१, पुणे ५७.७४, रायगड ६५.९०, रत्नागिरी ५८.५९, सांगली ६६.६३, सातारा ६६.६०, सिंधुदुर्ग ६४.५७, सोलापूर ६४.२३, ठाणे ४७.९१, उस्मानाबाद ६२.२१, वर्धा ६२.१७, वाशिम ६१.३३ आणि यवतमाळ जिल्ह्यात ६३.०९ टक्के मतदान झाले.

 इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन

विधानसभा निवडणूकीसाठी प्रत्यक्ष वापरात १ लाख १२ हजार ३२८ बॅलट युनिट (बीयु), प्रत्येकी ९६ हजार ६६१ इतक्या कंट्रोल युनिट (सीयु) आणि व्हीव्हीपॅट मशिन्स होत्या. तर राखीव २४ हजार ६२५ बीयु, २१ हजार २७७ सीयु आणि २८ हजार ९९२ व्हीव्हीपॅट ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी आज प्रत्यक्ष मतदानाचे दिवशी प्रारुप मतदान घेतले असता त्यात ३ हजार इव्हीएम- व्हीव्हीपॅट मशिन्स (५२२ बीयु, ९४९ सीयु आणि १ हजार ९७४ व्हीव्हीपॅट) नादुरूस्त झाल्या. तर प्रत्यक्ष मतदानाच्या काळात सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यात ४ हजार ६९ इव्हीएम- व्हीव्हीपॅट यंत्रे ज्यामध्ये ६६५ बीयु (०.५९%), ५९६ सीयु (०.६२%) आणि ३ हजार ४३७ व्हीव्हीपॅट ३.५६.%) नादुरुस्त झाल्या.प्रारुप मतदानाच्या वेळी तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी नादुरुस्त झालेली इव्हीएम व्हीव्हीपॅट त्वरीत दुरुस्त करण्यात , बदलण्यात आल्या. त्यामुळे मतदानप्रक्रियेवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही.इव्हीएम संदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १५२, शिवसेना ८९ व इतर १२० अशा एकूण ३६१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त तक्रारी संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयास कार्यवाहीसाठी त्वरीत पाठविण्यात आलेल्या आहेत.

 मतदानाची वैशिष्ट्ये :-

⦁ पुणे जिल्ह्यातील कसबापेठ मतदारसंघामध्ये, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) म्हणून प्रथमच ‘बार कोडींग’चा वापर करण्यात आला.

⦁ दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी एकूण ५ हजार ४३५ इतकी मतदान केंद्रे वरच्या मजल्यावरुन तळ मजल्यावर स्थलांतरित करण्यात आली. त्यामुळे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण झाली नाही.

⦁ अतिवृष्टी झाल्यामुळे कराड उत्तर मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ३१ या केंद्राचे स्थलांतर मतदानाच्या आदल्यादिवशी करण्यात आले.

⦁ काल दिनांक २० ऑक्टोबर रोजी दिवसा व रात्री महाराष्ट्राच्या मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र या भागात पाऊस झाला. उस्मानाबाद, लातूर, जालना, परभणी आणि सातारा येथे मुसळधार पाऊस झाल्याने काही ठिकाणी पोलिंग पार्टीच्या दळणवळणामध्ये अडचण निर्माण झाली होती. मात्र पोलिंग पार्टी वेळेवर कर्तव्याच्या ठिकाणी दाखल झाल्या आणि मतदान सुरळीतपणे पार पाडण्यात आले.

⦁ रायगड व पालघर जिल्ह्यामध्ये रुग्णालयातील रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

⦁  शहरी भागांमध्ये मतदारांनी तसेच सेलेब्रिटीजनी अतिशय उत्साहामध्ये भाग घेऊन मतदान केले.

Previous articleधो धो पावसात शरद पवार भाजप- सेनेवर बरसले!
Next articleस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा