भाजपच्या संकल्प पत्रात पुन्हा स्मारकांची वचने !

भाजपच्या संकल्प पत्रात पुन्हा स्मारकांची वचने !

मुंबई नगरी टीम

मुंबई : गेल्या विधानसभा निवडणूकीत दृष्टीपत्राद्वारे राज्यात  सत्ता आल्यास अरबी समुद्रात छ. शिवाजी महाराजांचे  स्मारक तर इंदू मिलमध्ये डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणा-या भाजपने यंदाच्या निवडणूकीतही ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यात ७२ हजार पदे भरण्याची घोषणा करण्यात येवूनही प्रत्यक्षात त्याची अंमबजावणी झाली नसतानाही येत्या पाच वर्षात १ कोटी रोजगार निर्माण करण्यात येणार असल्याचे वचन भाजपच्या आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या संकल्प पत्रात देण्यात आले आहे.

भाजपाने आज विधानसभा निवडणूकीसाठी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्याचे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विनोद तावडे यांच्या उपस्थितीत संकल्प पत्राचे प्रकाशन करण्यात आले. राज्याच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही या संकल्प पत्रातून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या संकल्प पत्रात ( जाहीरनामा ) अरबी समुद्रात छ. शिवाजी महाराजांचे  स्मारक तर इंदू मिलमध्ये डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन पुन्हा देण्यात येवून ही स्मारके २०२० मध्ये पूर्ण करण्यात येणार  असल्याचे सांगण्यात आले.गेल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेशी फारकत घेवून स्वबळावर लढणा-या भाजपने २०१४ साली पक्षाचा जाहीरनामा ( दृष्टीपत्र ) जाहीर केले होते. यामध्ये अरबी समुद्रात छ. शिवाजी महाराजांचे  स्मारक तर इंदू मिलमध्ये डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र गेल्या पाच वर्षात भाजपची सत्ता असतानाही या स्मारकाच्या भूमिपुजना शिवाय काही काम झाले नसल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असताना याबाबत काहीच ठोस पावले सरकारकडून उचलताना दिसत नाही असा आरोप विरोधकांकडून केला असता गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ( २८ मार्च २०१८) राज्य शासनाच्या विविध विभागातील ७२ हजार पदे येत्या दोन वर्षात भरण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

सरकारवर नाराज असलेल्या धनगर समाजाला खुष करण्यासाठी आज भाजपने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात  धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या प्रयत्नासह, धनगर समाजासाठी १ हजार कोटीचे विशेष पॅकेज देणार असल्याचे वचन दिले आहे.तर मागासवर्गीयांच्या मतावर डोळा ठेवत अनुसूचित जातीतील प्रत्येक कुटूंबाला घर देण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. या जाहीरनाम्यात मराठा समाजालाही खुष ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.आगामी पाच वर्षात मराठा समाजाच्या सर्वांगिण विकासाठी प्रयत्न करणार असल्याचे वचन देण्यात आले आहे.गड किल्लायांच्या संवर्धनासाठी ६२० कोटीची तरतूद करणार असल्याच्या आश्वासनासह, येत्या  पाच वर्षात १ कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनाला  राज्यातील तरूण वर्ग मतदानातून कसा प्रतिसाद देतो हे महत्वाचे आहे. दुष्काळ,वीज पुरवठा, शिक्षण, आर्थिक विकास, सर्वसमावेशी विकास, सुरक्षित महाराष्ट्र, आरोग्य, महिला, शेती, जनसामान्यांचे कल्याण, विमान वाहतूक, बंदर विकास-जलवाहतूक, सिंचन-पाणीपुरवठा व ग्राम विकास,  रेल्वे विकास, सुराज्य, शेती सुविधा, रस्ते विकास अशा विविध बाबींवर या जाहीरनाम्यातून घोषणांचा वर्षाव करण्यात आल्या आहे.

भाजपाच्या जाहीरनाम्यातील महत्वाच्या बाबी

 शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज पुरवठा

पाचवीपासून शेतीवर आधारित अभ्यासक्रम

महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये ५ आयटीपार्क उभारणार

अनुसुचित जमातींसाठी एकलव्य निवासी शाळा.

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्नसाठी प्रयत्न

पोलीस खात्याचे काम अधिक प्रभावी करणार

१ रुपयात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन देणार, स्त्री-पुरुष समानता या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करणार.

मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाठी प्रयत्न, सरकारच्या विविध योजना प्रभाविपणे राबवणार, धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न

राज्यातील ८ शहरांमध्ये नवीन विमानतळ सुरु होणार

कोकणातील बंदरं रेल्वे व महामार्गांनी महाराष्ट्राला जोडणार, मुंबई उपनगरात जलवाहतूक सेवा सुरु होणार

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन होणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेचा कोल्हापूरपर्यंत विस्तार करणार

Previous articleमुख्यमंत्री जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत ?
Next articleभाजपाचा जाहिरनामा म्हणजे ५ वर्षातील अपयशाचा कबुलीनामा