फ्री काश्मीर’चे बोर्ड झळकण्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी

फ्री काश्मीर’चे बोर्ड झळकण्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी

मुंबई नगरी टीम

रत्नागिरी : जेएनयूतील घटनेच्या निषेधासाठी सोमवारी रात्री मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात जमलेल्या तरुणांनी ‘फ्री काश्मीर’चे फलक झळकवणं, ही साधी घटना नाही. याचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

रत्नागिरीत ते पत्रकारांशी बोलत होते.चंद्रकांत पाटील म्हणाले की, “नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अनुषंगाने देशात पुन्हा एकदा दहशतवादी आणि डाव्या विचारांच्या चळवळींनी डोकं वर काढलं आहे. केंद्र सरकार यावर नियंत्रण आणण्यासाठी सक्षम आहे. मात्र, सोमवारी रात्री मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात जी घटना घडली, ते पाहता हे इतकं वरवरचं आव्हान नाही. याची पाळेमुळे खूप खोलवर आहेत. त्यामुळे गृहमंत्रिपद राष्ट्रवादीकडे असलं, तरी यामध्ये कोणताही हलगर्जीपणा न करता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डोळ्यात तेल घालून याकडे लक्ष दिले पाहिजे. आणि याची सखोल चौकशी केली पाहिजे.”

ते म्हणाले की, “भारत हा देश एकसंध राहिला पाहिजे, काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे ही भारतीय जनता पक्षाची नेहमीच भूमिका आहे. त्यामुळे अशा फुटीरतावादी चळवळींवर अंकुश लावण्याचे काम केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार नक्कीच करेल. मात्र, राज्य सरकारने देखील या घटनांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.”

Previous articleदेवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे “साथ साथ”
Next articleएकही उद्योग राज्याबाहेर जाऊ देणार नाही : मुख्यमंत्री