इंग्रजी माध्यमांच्या शाळांना दणका ; मराठी विषय होणार सक्तीचा

इंग्रजी माध्यमांच्या शाळांना दणका ; मराठी विषय होणार सक्तीचा

मुंबई नगरी टीम

मुंबई: राज्यात कार्यरत असलेल्या विविध मंडळांच्या शाळांमधून मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भातील कायदा येत्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात मांडण्यात येणार असून, या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मराठी विषय सक्तीचा होणार आहे.

इयत्ता बारावीपर्यंत शालेय अभ्यासक्रमात मराठी विषय अनिवार्य करणारा मराठी शिक्षण अधिनियम लागू करण्यासाठी मराठी भाषा विभागाकडून समिती गठीत करण्यात आली होती. विधी व न्याय विभागाने अन्य राज्यांचे अधिनियम व केंद्रीय शिक्षण हक्क अधिनियमाच्या तरतूदी लक्षात घेऊन आपले अभिप्राय दिले आहेत.हा कायदा लागू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून मराठी भाषा विभागाला सहकार्य केले जाईल.येत्या अधिवेशनात मांडावयाच्या अन्य राज्यांच्या कायद्याच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या मराठी भाषा अधिनियम प्रस्तावावर विस्तृत चर्चा करण्यात आली. कायदा तयार करतांना त्यातील तरतूदींचे पालन करणे सर्व शाळांना सुलभ व्हावे. फिरतीची नोकरी असणा-या पालकांच्या पाल्यांना बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात आल्यानंतर वरच्या वर्गात मराठी विषय घेणे अवघड होईल तेव्हा त्यांना यातून सुट मिळावी यासाठीची तरतूदही त्यात असावी. मराठीचा वापर वाढावा यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याची गरज असल्याचे देसाई यांनी सांगितले.

Previous article……तर डॉ.आंबेडकर स्मारकाचे काम दोन वर्षांत पुर्ण: शरद पवार
Next articleमंत्रालयात येणा-या जनतेचा वेळ वाचविण्यासाठी काँग्रेसचा “लोकदरबार”