काविळीचं पिवळं जग राम कदमांना दिसतंय : नवाब मलिक
मुंबई नगरी टीम
मुंबई : कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतं, तशीच काहीशी अवस्था भाजपचे राम कदम यांची झालेली दिसते अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी केली आहे.
भाजपाचे आमदार राम कदम यांनी आगामी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारवर टिका केली आहे. त्यांच्या या टिकेचा समाचार राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार मलिक यांनी घेतला आहे. आ.राम कदम यांनी चुकीची वक्तव्ये करण्याआधी विधानसभेतील कामकाजाचे नियम समजून घ्यावेत असा टोलाही आ. मलिक यांनी लगावला आहे.विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित करायचे प्रश्न ३० दिवस आधी देणे अपेक्षित असते. सभागृहात लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित करता येऊ शकतात याची माहितीही मलिक यांनी करुन दिली. कामकाज सल्लागार समितीच्या अजेंड्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मान्यता दिली आहे याची आठवणही मलिक यांनी आ. राम कदम यांना करुन दिली आहे.