हिवाळी अधिवेशनात मोठा राजकीय भूकंप होणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येताच,सत्तेतून पायउतार झालेल्या भाजपमधिल मोठा नेत्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केल्याने भाजपातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.येत्या सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनात मोठा राजकीय भूकंप घडणार असल्याचे संकेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत यांनी वर्तवले आहेत.
गेल्या सरकारच्या काळात राज्यामध्ये ओबीसींच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने करण्यात आली.मात्र फडणवीस सरकार त्यांना न्याय देवू शकले नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी नेत्यांना भाजपच्या नेत्यांनी लक्ष्य करून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.एवढेच नाही त्यांना पराभूत करण्यात आले.त्यामुळेच सध्या अनेक भाजपाच्या नेत्यांच्या मनातील खदखद बाहेर पडल्याचे दिसत आहे असा दावाही राऊत यांनी केला.भाजपातील बहुजन समाजाच्या मोठ्या नेत्यांमधिल खदखद बाहेर पडत आहे.नागपूर अधिवेशनाचा इतिहास पाहिला तर येत्या सोमवारपासून नागपूरात सुरू होणा-या अधिवेशनात भाजपात मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही राऊत म्हणाले.काल परळीत झालेल्या मेळाव्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे पक्ष सोडण्याचा इशारा दिला आहे.त्यामुळे भाजपातील कोण कोणते मोठे नेते पक्ष सोडणार हे लवकरच कळेल असे विधानही त्यांनी केले.तर भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात असून, राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी केला आहे.