खातेवाटपाची प्रतिक्षा न करता मंत्री वर्षा गायकवाडांनी घेतला कार्यालयाचा ताबा
मुंबई नगरी टीम
मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी राज्याच्या तीन पैकी एक महिला मंत्री प्रा वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या तीस-या मजल्यावरील कार्यालयाचा ताबा घेतला. खातेवाटप झाले नसले तरी त्याची प्रतिक्षा न करता लोकांच्या अपेक्षाप्रमाणे कामाला सुरूवात करावी लागेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला पाच दिवसाचा कालावधी उलटून गेला असतानाही महत्वाच्या खात्यावरून कोणाला कोणते खाते द्यायचे यावरून खाते वाटपास विलंब झाला असतानाच मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या मंत्री कार्यालयाचा ताबा घेतला.सावित्रीबाईंचे योगदान सा-या महिलासाठी महत्वाचे आहे. आजच्या दिवशी मंत्री म्हणून कामकाजाला सुरूवात करण्याचा निश्चय केला होता. कारण आम्ही जे काही आहोत ते सावित्रीबाईंच्या त्याग आणि योगदानामुळेच आहोत. त्यामुळे खाते जाहीर झाले नाही तरी आजच्या दिवशी या कार्यालयात येवून कामाला सुरूवात करण्याला माझ्या दृष्टीने महत्व आहे असे मंत्री गायकवाड यांनी सांगितले.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात गायकवाड यांच्याकडे महिला आणि बाल कल्याण, विशेष सहाय्य या खात्यांचा पदभार होता. या मंत्रिमंडळात जे कोणते खाते मिळेल त्या खात्याचा सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी सर्वस्वाने उपयोग करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.गायकवाड यांना पक्षाकडून आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्याची संधी प्राप्त झाली आहे .