मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील आदेशापर्यंत मुंबई,नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड,नागपूर या प्रमुख शहरातील व्यायामशाळा,चित्रपटगृह,जलतरण तलाव,नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तर दहावी आणि बारावीची परीक्षा वगळता पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.मध्यरात्रीपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली.
राज्यात कोरोना बाधीत १७ लोकांमध्ये गंभीर लक्षणे दिसत नसले तरी लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर पुढील आदेशापर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या प्रमुख शहरातील चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दहावी आणि बारावीची परीक्षा वगळता पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. नाहक भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी मुंबईतील शाळा बंद ठेवण्यात येणार नाहीत. करोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी लोकांनी अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळली पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केले.मॉल्स,रेस्तराँ, हॉटेल बंद करण्यात येणार नसले तरी अशा ठिकाणी लोकांनी जाणे टाळावे,अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळावी असेही आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले
रेल्वे आणि बस अत्यावश्यक सेवा असल्याने त्या सेवा बंद करु शकत नाही. तसेच धार्मिक,सांस्कृतिक,राजकीय आणि क्रीडा स्पर्धा घेण्यात येऊ नयेत. अशा कार्यक्रमांसाठी सरकारकडून परवानगी दिली जाणार नाही. अशा कार्यक्रमांना परवानगी दिली असेल तर ती रद्द करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.