मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक आपत्तीच्या अनुषंगाने राज्याच्या महसुली जमेवर प्रतिकूल परिणाम झाला असल्याने शासनाने गेल्या महिन्याचे कर्मचाऱ्यांचे पगार दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला होता.मात्र या म्हणजेच एप्रिल महिन्याचा पगार एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात उदभवलेल्या कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे महसुली उत्पन्नात झालेली घट लक्षात घेता खर्चात काटकसर करण्याच्या उद्देशाने सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा पगार मार्च महिन्या पासून दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने मार्च महिन्याच्या पगाराचा पहिला टप्पा अदा करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.एप्रिल महिन्यात मार्च महिन्याच्या उर्वरित वेतनाचा दुसरा टप्पा व एप्रिलचा पहिला टप्पा प्रदान करण्याचे विचाराधीन होते. तथापि प्रत्येक महिन्यात पंधरा-पंधरा दिवसाची दोन देयके तयार करावी लागल्याने देयके तयार करणारी आस्थापना व कोषागारांचा कामावरचा ताण वाढला असता.सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने शासकीय कार्यालये सध्या १० टक्के एवढ्या कर्मचारी क्षमतेवर सुरू आहेत.काही विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक महिन्यात दोन देयके तयार करण्यामुळे वेतन प्रदान करण्यास आणखी विलंब झाला असता त्यामुळे एप्रिल महिन्याचा पगार एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मार्च महिन्याचे उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील पगार शक्यतो गणेशोत्सवाच्या वेळी देण्याचे प्रस्तावित असून याबाबत स्वतंत्ररीत्या आदेश निर्गमित करण्यात येतील, असे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.