मुंबई नगरी टीम
मुंबई : बंधपत्रित ( बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
कोरोना लढाईला यामुळे निश्चितपणे बळ मिळणार आहे. डॉक्टर्सना सुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना ६० हजारांच्या ऐवजी ७५ हजार,आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना ७० हजार ऐवजी ८५ हजार इतर भागातील एमबीबीएस डॉक्टर्सना ५५ हजारांऐवजी ७० हजार इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना ६५ हजारांऐवजी ८० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या लढाईत जीव धोक्यात घालून लढणाऱ्या बंधपत्रित डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या मानधनात कपात केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने लक्ष घालावे अशी विनंती मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्राद्वारे केली होती.कोरोनामुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय आणीबाणीच्या काळात डॉक्टर हेच देव असल्याचा अनुभव आपल्या सर्वांना येत आहे. विशेषत: राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमधील कार्यरत असलेल्या डॉक्टरांचे तर आपण कितीही आभार मानले तरी ते अपुरेच ठरतील, इतके उत्कृष्ट काम शासकीय सेवेतील डॉक्टर्स निष्ठापूर्वक करत आहेत. असे असतानाही शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या मानधनात सरकारने कपात करणे, हे कोणत्याही दृष्टीने पटनार नाही. त्यांचे मानधन पूर्ववत पद्धतीने देण्यात यावे अशी मागणी या पत्रात अमित ठाकरे यांनी केली होती.