उद्धव ठाकरेंना प्रशासकीय कामाचा अनुभव नाही म्हणणारे तोंडावर आपटले

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनावर मात करणारे राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यांनी समाज माध्यामद्वारे विरोधकांवर टीकास्त्र सोडत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्तुती केली आहे.राज्यातील कोरोनाचा संकटात तुटपुंज्या पैशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धीरोदात्तपणे काम करत आहेत.त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव नाही म्हणणारे आज तोंडावर आपटले आहेत.त्यांचा राजीनामा मागता ? अहो, कोरोना प्रत्येक देशात घुसला.मग काय इटली, फ्रान्सच्या राष्ट्रप्रमुखांचा,बोरिस जॉन्सन आणि ट्रम्प यांचासुद्धा राजीनामा मागायचा का? महाराष्ट्र भारतातच आहे ना ? मग नरेंद्र मोदींचा राजीनामा का नको ? पण आम्हाला राजकारण करायचे नाही कारण मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे आम्ही नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.

कोरोनावर यशस्वी मात केलेले गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांनी त्यांच्या फेसबुकवरून कोरोनाच्या संकटात राजकारण करणा-या विरोधकांना टोला लगावला आहे. लॉकडाउनला दोन महिने उलटून गेले तरी देशात कोरोनाचा प्रसार वाढत आहे,याचा अर्थ हा एक प्रचंड वेगाने पसरणारा संसर्गजन्य रोग आहे.शिवाय लागण झालेल्यांपैकी जेमतेम २.५ टक्के लोक यात मरण पावत आहेत. ९७ ते ९८ टक्के लोक पूर्ण बरे होऊन घरी जातायत.भारताटीबी, मलेरिया, अतिसार, किंवा कुपोषणामुळे मरणाऱ्यांची संख्या यापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे. तसे असेल तर आपण या रोगाचा अकारण धसका घेतला आहे का, हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे.मी कोरोनातून बरा होऊन घरी आलो म्हणून आता हे ज्ञान पाजळतोय अशी शंका कुणालाही येणे स्वाभाविक आहे.मी फाजील आत्मविश्वासात राहिलो.आपण आता पन्नाशी ओलांडली आहे,पंचविशीतले नाही,याचा अतिउत्साहात मला विसर पडला. राजकारणातील धकाधकीमुळे वेळेवर खाणं नाही, पुरेशी झोप नाही, व्यायामाची सवय मोडलेली, यामुळे माझ्या शरीराची प्रतिकारशक्ती क्षीण झाली आहे हे मी ओळखायला हवे होते. सबब, हे ज्ञान पाजळणे नाही तर मी केलेले परीक्षण आहे असेही त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

इटलीत लॉकडाऊन फसला तो तिथल्या लोकांच्या निष्काळजीपणामुळे. त्यांना लॉकडाऊन ही सुट्टी वाटली आणि ते मौजमजा करायला बाहेर पडले. इतका टिचभर देश असूनही इटली कोरोनाच्या विळख्यात सापडला. भारतासारख्या आकाराने आणि लोकसंख्येने अतिविशाल देशात तो यशस्वी होईल का याचा पूर्ण विचार नाट्यमय घोषणा करण्याची हौस असलेल्या पंतप्रधानांनी करायला हवा होता. हातात दमडी नाही, काम नाही, अन्न नाही, निवारा नाही, अशा अवस्थेत आपापल्या घरापासून हजारो मैल दूर पोटासाठी गेलेल्या मजुरांचे काय भयानक हाल झाले, होतायत, हे आपण पाहतो आहोत. मोडकळून पडलेल्या संसाराचे अवशेष डोक्यावर घेऊन चालणारे त्यांचे तांडे, वाटेतल्या प्रत्येक राज्याच्या सीमेवर होणारी त्यांची अडवणूक, रुळावरून भरकटलेल्या त्यांच्या रेल्वेगाड्या, प्रवासाचे दिवस वाढल्यामुळे अन्नावाचून मरणारे त्यांचे लहानगे, हा सारा आतडी पिळवटणारा प्रकार आहे.

तीन आठवड्यांपूर्वी स्टॅनफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक आणि नोबेल पारितोषिक विजेते मायकल लेविट म्हणाले की कोरोनापेक्षा कित्येक पटीने जास्त लोक (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या) लॉकडाउनमुळे मरतील. गावात पोट भरत नाही म्हणून ही माणसे शहरांत आली. परत गावी जाऊन ते कसे पोट भरणार? धरून चालू की आज ना उद्या कोरोनाची साथ ओसरेल. पण मरणशय्येवर पडलेली अर्थव्यवस्था त्यांना पुन्हा शहरात नोकऱ्या देईल? शहरी मध्यमवर्गाचा स्वार्थी, भावनाशून्य चेहरा पाहिलेले कितीजण परत यायला धजावतील? हे साधे प्रश्न प्रश्न जरी स्वतःला विचारले तरी किती भयावह आर्थिक आणि सामाजिक स्थितंतरं यापुढे होणार आहेत याची कल्पना येते आणि प्रा. लेविट यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे लक्षात येतं. भक्तगणांना हार्वर्डच्या ऐवजी हार्ड वर्क आवडतं. आता तर ते आत्मनिर्भर व्हायला निघालेत. त्यामुळे मायकल लेविट काय म्हणतायत ते त्यांच्या गळी उतरणार नाही. त्यांना लोकलच्या बाबतीत व्होकल व्हायचा आदेश मिळाला आहे. तसं असेल तर त्यांनी उद्योगपती राजीव बजाज लॉकडाऊनच्या बाबतीत काय म्हणाले ते जरा ऐकावे. बजाज तर स्थानिकच आहेत ना ?

हे सारं सांगण्याचा हेतू इतकाच की आता आपली आयुष्यं हळूहळू पूर्वपदावर आणायला हवीत. एखाद्या धोकादायक आजारापासून स्वतःची काळजी घेणं आणि त्याची दहशत घेऊन कड्याकुलपात दिवाभीतासारखं बसून राहणं यात फरक आहे. दोन वेळा भाकरतुकडा ताटात पडण्यासाठी त्या मजुरांना आज जी शर्थ करावी लागणार आहे, ती वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते. आज शक्यता आहे की तुमच्यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाली सुद्धा असेल. पण काहीच लक्षणं दिसत नाहीत म्हणजे तुमच्या शारीरिक प्रतिकारशक्तीने त्यावर मात केली आहे. ज्याला “अँटीबॉडीज” म्हणतात त्या तुमच्या शरीरात तयार झाल्या असतील. अशातूनच आधुनिक वैद्यकशास्त्रात ज्याला हर्ड इम्यूनिटी (समूहाची प्रतिकारशक्ती) म्हणतात ती तयार होते. आपल्याकडे ६० टक्के लोकसंख्येचं सरासरी वय चाळिशीच्या आत आहे. कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली, आणि ताप नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःला दोनतीन आठवडे एकांतवासात ठेवलात तरी आरामात बरे व्हाल. काळजी घ्या, भीती बाळगू नका. मानसिक ताण नसेल तर शरीरही साथ देतं. नाहीतर माझ्यासारखी हॉस्पिटलमध्ये पडण्याची पाळी येते.

पुन्हा एकदा सांगतो, कोरोना झालेले ९७ ते ९८ टक्के लोक पूर्णतः बरे  होत आहेत. तुमची प्रतिकारशक्ती हाच त्यावर एकमेव उपाय आहे.कोरोनाविषयक सध्या येणाऱ्या तमाम बातम्यांमध्ये मुंबई आणि महाराष्ट्राची अवस्था फार बिकट असल्याचं सतत सांगितलं जात आहे. हे तद्दन खोटं असून मुंबईला बदनाम करण्यासाठी रचलेलं षडयंत्र आहे, असा स्पष्ट आरोप मी आज करतोय. तिचं अनन्यसाधारण आर्थिक महत्त्व डोळ्यात खुपणारे, ती आपल्याला मिळाली नाही म्हणून तिच्या वाईटावर टपून बसलेले कोण लोक आहेत हे मी नाव घेऊन सांगायची गरज नाही. मुलीने प्रेमप्रस्ताव नाकारला की तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकणारे आणि आज मुंबईतील कोरोनाच्या खोट्या बातम्या पसरवणारे एकाच जातीचे आहेत. मी तर म्हणेन एकदा होऊनच जाऊदे मुंबई आणि अहमदाबादमधील कोरोनाची तटस्थ पथकांकडून तपासणी. येऊ द्या खरी आकडेवारी बाहेर. ‘नमस्ते ट्रम्प’ इव्हेंटसाठी दीड लाख लोक एकत्र गोळा झाल्यामुळे तिथे आज कोरोनाचा काय नंगानाच सुरु आहे हे जगाला आता कळायलाच हवं. साथ आटोक्यात येण्याची काही चिन्हं सोडा, थेट मुख्यमंत्री विजय रुपानींचं नाव गुंतलेलं व्हेंटिलेटर भ्रष्टाचार प्रकरण घडून सुद्धा गेलं. तुलनेने, आहे त्या तुटपुंज्या पैशात  उद्धव ठाकरे धीरोदात्तपणे काम करत आहेत. त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव नाही म्हणणारे तोंडावर आपटले आहेत. आणि त्यांचा राजीनामा मागता? अहो, कोरोना प्रत्येक देशात घुसला. मग काय इटली, फ्रान्सच्या राष्ट्रप्रमुखांचा, बोरिस जॉन्सन आणि ट्रम्प यांचासुद्धा राजीनामा मागायचा का? महाराष्ट्र भारतातच आहे ना? मग नरेंद्र मोदींचा राजीनामा का नको? पण आम्हाला राजकारण करायचे नाही कारण मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे आम्ही नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

मुंबईत झालेल्या कामाचे कौतुक देशातील केंद्राच्या दोन नामांकित संस्थांनी केले आहे व मुंबईचे कामाचे मॉडेल देशभरात राबवावे असे म्हंटले आहे आणि गुजरात उच्चन्यायालय म्हंटले की गुजरात च्या हॉस्पिटल ची परिस्थिती काळ कोठडी पेक्षा भयंकर आहे गुजरात च्या मुख्यमंत्र्यांचे नाव व्हेंटिलेटर भ्रष्टाचार प्रकरणात घेतले जाते तरी हे सगळे आमच्या वर टीका करणाऱ्या विरोधी पक्षांना दिसत नाही.डोळ्यावर पट्टी बांधलेल्याना कसे दिसणार हे सगळे कारण त्यांना करायचे आहे फक्त राजकारण आणि हा महाराष्ट्र द्रोह आहे अशी टीकाही आव्हाड यांनी या पोस्टद्वारे केली आहे.

Previous articleकोरोनाशी लढा देत असतानाही अशोक चव्हाणांनी केंद्राकडे केली ही मागणी
Next articleखुशखबर : डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय