कोरोनाशी लढा देत असतानाही अशोक चव्हाणांनी केंद्राकडे केली ही मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनाची लागण झालेले राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्यावर येथील ब्रिच कॅडी या रूग्णालयात सुरू असून,कोरोनाशी लढा देत असलेल्या चव्हाण यांनी काँग्रेसच्यावतीने राबविण्यात आलेल्या स्पीक अप इंडिया या मोहिमेत सहभाग घेवून केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली.

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड मधून मुंबईतील ब्रिच कॅडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.सध्या देशात आणि राज्यात आलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील  अडचणीत सापडलेल्या गरीब, कामगार, स्थलांतरीत मजूर, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी काँग्रेसने पक्षाच्यावतीने देशव्यापी स्पीक अप इंडिया ही मोहिम राबविली याला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.या ऑनलाईन मोहिमेत राज्यातील मंत्री, ज्येष्ठ नेते,आमदार,खासदार,पक्ष पदाधिकारी,जिल्हा,तालुका पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हजारोंच्या संख्येने ट्विटर,फेसबुक,युट्यूब, इंस्टाग्रामवरून या मोहिमेत सहभाग घेतला. गरिबांच्या खात्यात १० हजार रुपये जमा करावेत व पुढील सहा महिने प्रतिमहा ७५०० रुपये द्यावेत, स्थलांतरीत मजुरांना सुखरुप घरी पोहचवण्याची व्यवस्था केंद्र सरकारने करावी.सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना आर्थिक मदत द्यावी तसेच मनरेगातर्फे २०० दिवसांचा रोजगार द्यावा या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

पक्षाच्यावतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण यांनी ब्रिच कॅडी या रूग्णालयातून सहभाग घेवून केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेच्या मागण्या तातडीने मंजूर कराव्यात अशी मागणी केली आहे. चव्हाण यांनी या मागणीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर केला आहे.

Previous articleकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  घेतला मोठा निर्णय
Next articleउद्धव ठाकरेंना प्रशासकीय कामाचा अनुभव नाही म्हणणारे तोंडावर आपटले