परवापासून राज्यातील हॉटेल्स आणि लॉजेस सुरू होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही उद्योगांना परवानगी देण्यास सुरूवात केल्यानंतर आता परवापासून राज्यातील हॉटेल्स आणि लॉजेसना  ३३ टक्के क्षमतेसह सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली होती.

मिशन बिगीन अगेनमध्ये राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत.महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सांगितले होते. त्यानंतर यासंदर्भात एक नियमावली तयार करण्यात येवून परवापासून म्हणजेच ८ जुलैपासून राज्यातील हॉटेल्स आणि लॉजेसना  ३३ टक्के क्षमतेसह सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल्स आणि लॉजेस सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही.राज्यभरातील हॉटेल्स आणि लॉजिंग सुरू करण्यात येणार असल्याचा आदेश आज जारी करण्यात आला आहे.येत्या ८ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

मुंबई, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांसाठी, तसेच महानगरपालिका असलेल्या शहरांसाठी वेगळ्या अटी घालण्यात आल्या आहेत,या ठिकाणच्या केवळ कंटेन्मेंट झोनपासून बाहेर असलेल्या हॉटेल्सना ही परवानगी दिली गेली आहे. यात हॉटेल्स, गेस्ट हाऊस, लॉजमध्ये ३३ टक्के क्षमतेने ग्राहकांना राहण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. उर्वरित विभागांसाठीदेखील हीच ३३ टक्क्यांची अट लागू होणार आहे. त्याचप्रमाणे उर्वरित ६७ टक्के क्षमता ही क्वॉरंटाईन करण्यासाठी वापरण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे.लॉकडाऊनच्या काळात हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. आज राज्य सरकारने परवानगी दिल्याने 8 जुलैपासून ग्राहक हॉटेल्स आणि लॉजेसमध्ये जाऊ शकणार आहेत. हॉटेलची जी क्षमता आहे त्याच्या ३३ टक्के पाहुण्यांना संमती दिली जाणार आहे.

हॉटेलच्या दर्शनी भागात कोविड संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय आणि मार्गदर्शिका या विषयी माहिती देणारे फलक असणे आवश्यक आहे त्याबरोबरच गर्दी टाळण्यासाठी आणि वाहनतळासाठी योग्य व्यवस्था आवश्यक आहे. सामाजिक अंतर राखले जावे अशी बैठक व्यवस्था सुनिश्चित करणे बंधनकारक आहे. थर्मल स्क्रिनिंग करण्याबरोबरच स्वागत कक्षाला संरक्षक काच असणे आवश्यक आहे. सर्वांसाठी सहज निर्जंतुकीकरण द्रव्य उपलब्ध करणे आवश्यक आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांसह अतिथींना मास्क, हातमौजे इत्यादी साहित्य उपलब्ध करणे आवश्यक आहे. पैशाच्या देवाणघेवाणीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला पाहिजे. उद्‌वाहन (लिफ्ट) मधील संख्याही  नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. याबरोबरच वातानुकुलित यंत्रणेसंदर्भात वेळोवेळी केलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. तापमान २४ ते ३० डिग्री अंश सेल्सीअस आणि आर्द्रता ४० ते ७० टक्के असावी.हॉटेलमध्ये केवळ लक्षण नसलेल्या अतिथींनाच प्रवेश देण्यात यावा, त्यांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. आरोग्य सेतू ॲप त्यांच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी आपले प्रवास तपशिल, आरोग्य विषयक माहिती आणि ओळखपत्र देणे आवश्यक आहे. हॉटेलच्या खोल्या स्वच्छ निर्जंतुकरण केलेल्या असणे आवश्यक आहे. प्रत्येक अतिथी गेल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा होणे आवश्यक आहे.एखादा अतिथी आजारी किंवा लक्षणाचा दिसल्यास त्याचे विलगीकरण करणे आवश्यक आहे. याबाबतचे आदेश आज मुख्यसचिव संजयकुमार यांनी निर्गमित केले आहेत.

Previous articleवैष्णवी गोरे खुन प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवले जाणार
Next articleआठवड्यापूर्वी मराठी भाषेची सक्ती करणारे परिपत्रक आणि आज चक्क इंग्रजीत आदेश