तुम्ही जिम सुरु करा, राज ठाकरेंचं जिम चालकांना आवाहन

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत अनेक उद्योगधंदे हळूहळू सुरु केले जात आहेत. मात्र राज्यातील जिम काही अद्याप सुरु होण्याच्या मार्गावर नाही. या पार्श्वभूमीवर आज जिम व्यावसायिक आणि बाॅडी बिल्डर्सनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्ण कुंजवर जाऊन भेट घेतली. यावेळी तुम्ही जिम सुरु करा, किती दिवस लाॅकडाउनमध्ये काढणार आहात?, असं म्हणत जिम चालकांना जिम पुन्हा सुरु करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

जिम व्यावसायिक आणि बाॅडीबिल्डर्सनी आज राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी राज ठाकरेंनी जिम सुरु करण्याचं आवाहन केलं आहे. “केंद्र सरकारने नियमावली दिली आहे, त्या पाळून काळजी घ्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील माझं बोलणं झालं. त्यांचंही म्हणणं आहे जिम सुरु झालं पाहिजे. जिम सुरु करा, बघू काय होतं”, असा सल्ला राज ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.

कोरोनामुळे देशासह राज्यातही लाॅकडाउन पुकारण्यात आला होता. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनश्च हरी ओम असा नारा दिला त्यामुळे अनेक उद्योगधंदे हळूहळू सुरु करण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार दुकानांपासून ते सलून, ब्युटी पार्लरला देखील अटी, शर्तींनुसार सुरु करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र जिम सुरु करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. याकरता जिम चालकांनी आंदोलन देखील केलं होतं.

Previous article“कहां गये वो २० लाख करोड” ? युवक काँग्रेसचे अनोखं आंदोलन
Next article‘त्या’ गुणवंत विद्यार्थ्याच्या शिक्षणाला मिळाला पार्थ पवारांच्या मदतीचा हात!