मुंबई नगरी टीम
अहमदनगर : लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ रुपयात सॅनिटरी पॅड देण्याबाबतचा उल्लेख केला. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोदींचे आभार मानले आहेत. ट्विटरवर यासंबंधीत पोस्ट शेअर करत त्यांनी याबाबत भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून जतेला संबोधिक करताना अनेक मुद्दे मांडले. यावेळी त्यांनी महिलांसंदर्भातील मासिक पाळीविषयीचा देखील मुद्दा मांडला. यावर आभार व्यक्त करत रोहित पवार यांनी म्हटले की, “लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी १ रुपयात सॅनिटरी पॅड देण्याबाबतचा उल्लेख केला. महिला-भगिनींच्या आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयाची दखल घेतल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानायला हवेत. समाजात जनजागृतीच्या दृष्टीने ही अत्यंत चांगली गोष्ट झाली.
वैयक्तिक स्वच्छता व त्यातही महिलांची मासिक पाळीचा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. पण आपल्या समाजात अजूनही या विषयावर उघडपणे चर्चा केली जात नाही. विशेषतः ग्रामीण भागामध्ये याबाबत दुर्लक्ष होत असल्याचे दिसते, परिणामी अनेक महिला-भगिनींना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर महिलांना १ रुपयात सॅनिटरी पॅड देण्याचा पंतप्रधानांनी केलेला उल्लेख हा महत्त्वपूर्ण ठरतो. महिला-भगिनींच्या आरोग्यासाठी सॅनिटरी पॅडचे महत्त्व लक्षात घेता मी ही या क्षेत्रांत बऱ्याच दिवसांपासून काम करतोय. ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या (बारामती) माध्यमातून बचत गटाच्या महिलांकडून ‘सोबती’ नावाने सॅनिटरी पॅडस् तयार करण्यात येत असून आतापर्यंत सुमारे अडीच लाख मुलींना ते मोफत दिले. त्यासाठी माझ्या आईने (सुनंदाताई) खूप परिश्रम घेतले, हे मी अभिमानाने सांगू शकतो. मुलींना फक्त सॅनिटरी पॅडचे वाटपच केले नाही तर कर्जत-जामखेड या माझ्या मतदारसंघासह सातारा, कोल्हापूर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, नगर, जालना या भागांतील शाळकरी मुलींपर्यंत पोचून आईने त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधला. त्यांचे गैरसमज, शंका दूर करत त्यांना सॅनिटरी पॅडचे महत्त्व पटवून दिले.
महिला, पालकांनाही विश्वासात घेऊन त्यांच्यातही याबाबत जागृती केली. शिवाय हे पॅड बचत गटाच्या महिलांकडूनच बनवून घेण्यात येत असल्याने त्यांनाही रोजगार मिळतो, शिवाय ते पर्यावरण पूरक असल्याने प्रदूषणाचाही प्रश्न निर्माण होत नाही. पहिल्या टप्प्यात सोबतीचे अडीच लाख पॅड मोफत दिले असून दुसऱ्या टप्प्यात ते ना नफा ना तोटा या तत्त्वावर २० रु. मध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे पंतप्रधानांनी या विषयाला हात घातल्याने महिला-भगिनींच्या आरोग्याबाबत प्रत्येकजण संवेदनशीलतेने विचार करेल आणि त्यामुळे समाज सुदृढ होण्यास हातभार लागेल, असा विश्वास आहे”, असे रोहित पवार म्हणाले.