मुंबई नगरी टीम
मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर कोरोना काळात विद्यार्थ्यांना कमी त्रास देऊन घरातल्या घरात परीक्षा देता येईल,यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.विद्यार्थ्यांच्या परीक्षा कधी व कशा घेतल्या जाव्यात या अनुषंगाने चाचपणी केली जात आहे. तर विद्यार्थी घराबाहेर पडून परीक्षा देणार नाहीत,यावर सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंचे एकमत असल्याचे देखील सामंत म्हणाले.
अंतिम वर्षाच्या परीक्षेसंबंधित मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये दोन संचालकांचा देखील समावेश असून त्यांची आज बैठक पार पडली. त्यानंतर उदय सामंत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माहिती दिली.यावेळी अधिकतर विद्यापीठांच्या कुलगुरूंनी परीक्षेसाठी मुदतवाढीची मागणी केली आहे. मुंबई विद्यापीठाकडून ३१ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी युजीसीकडे करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. तर अन्य काही विद्यापीठांनी देखील ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मागितली आहे.त्यामुळे २ सप्टेंबरला आपत्कालीन व्यवस्थापनाची बैठक घेऊन यूजीसीकडे याबाबत मागणी करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास होणार नाही,याची काळजी घेतली जाणार आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी संपूर्ण सप्टेंबर महिना दिला जाईल,अशी ग्वाही सामंत यांनी दिली. शिवाय परीक्षा कमी गुणांची घेण्याचाही विचार सुरू आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांवर ताण पडू नये. तसेच ऑनलाईन परीक्षेत अनेक प्रकार असून ते कशा पद्धतीने अंमलात आणले जाईल.परीक्षेचे वेळापत्रक, निकालाची तारीख, एटीकेटी या सर्व मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल,अशी माहितीही उदय सामंत यांनी यावेळी दिली.