मुंबई नगरी टीम
मुंबई : अंतिम वर्ष परिक्षेबाबत आज महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रॅक्टिकलच्या परीक्षा होऊ शकतात.तर ऑक्टोबर महिन्यात मुख्य परीक्षा घेण्यात येवून ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर करण्याचे प्रयत्न आहे.अंतिम वर्षाची परीक्षा विद्यार्थ्यांना घरी बसून देण्यास राज्यपालांनी मंजुरी दिली असून,परीक्षा सोप्या पद्धतीने होणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्यातील सर्व कुलगुरूंची आज राजभवन येथे ऑनलाईनच्या माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत,राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, परीक्षेसंदर्भात गठीत केलेल्या समितीचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर उपस्थित होते.अंतिम वर्षाची परीक्षा येत्या ऑक्टोबरमध्ये होणार असून, ३१ अक्टोबरपर्यंत निकाल जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. प्रॅक्टिकल परीक्षा सुद्धा सोप्या पध्दतीने घेण्याचे प्रयत्न असल्याचे सामंत यांनी सांगितले. अहवाल अंतिम निर्णय घेवून परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्यायच्या यावर उद्या शुक्रवारी निर्णय घेण्यात येणार आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतही निर्णय घेणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रॅक्टिकल्सच्या परीक्षा होतील असे सांगतानाच विद्यार्थ्यांनी मनात कोणताच संभ्रम न ठेवता अभ्यासाला लागावे असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना घरात बसून परीक्षा द्यावी लागली पाहिजे यासाठी आमचा आग्रह होता.परीक्षा घेण्यासंबंधी ऑनलाइन,ऑफलाइन असे चार प्रकार असून त्यावर उद्या निर्णय होणार आहे. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावून विद्यापीठ अनुदान आयोगाला विनंती करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार १५ सप्टेंबर पासून सुरू करून ३१ ऑक्टोबरपर्यंत निकालासह परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषद आणि विद्यापीठाच्या परीक्षा मंडळा समोर ठेऊन दोन दिवसात शासनास कळवावे आणि राज्य आपत्कालीन प्राधिकरणाची बैठक मंगळवारी घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.