मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात लवकरच मेगा पोलीस भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. परंतू या पोलीस भरतीच्या निर्णयावरून भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारवर नाराजी दर्शवली आहे.सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना सरकारने पोलीस भरती करण्याचा निर्णय का घेतला ?, असा सवाल संभाजीराजेंनी केला आहे. याबाबतत सरकारचे टाईमिंग चुकले आहे. आरक्षणासाठी झगडत असलेल्या मराठा समाजाला एकडे पाडण्याचा कुटील डाव तर नाही ?, असे महणत संभाजीराजेंनी ही भरती प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत महाराष्ट्रात नोकर भरती थांबवा, अशी मागणी संभाजीराजेंनी पत्राद्वारे केली आहे. “संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे की, जो पर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती घेण्यात येऊ नये. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. याचे मराठा समाजामध्ये तीव्र पडसाद उमटत असून, त्या भावनेचा सरकारने आदर केला पाहिजे. अश्या अडचणीच्या काळात शासनाने पोलीस भरती चा निर्णय जाहीर करून मराठा समाजाला चिथावणी देण्याचा प्रकार केला आहे. मराठा समाज ह्या निर्णयाचा विरोध करणार हे माहिती असून सुद्धा तुम्ही पोलीस भरती काढली, हे पूर्णतः चुकीचे आहे. मराठा समाजाला एकटे पाडण्याचा हा कुटील डाव तर नाही ना? अशी प्रतिक्रिया समाजातील जाणकारांकडून येत आहेत.
मी शासनाला एकच सांगू इच्छितो, की मराठा समाज हा इतरांचे हक्क हिरावून घेऊ इच्छित नाही. त्यांना त्यांचा हक्क हवा आहे. आणि या लढ्यात सर्व जाती समूह मराठा समाजाच्या सोबत आहेत. मोठा भाऊ अडचणीत असल्यामुळे सर्व बहुजन समाज हा लहान भावाप्रमाणे मराठा समाजाच्या सोबत होता, आहे आणि राहणार. जे आरक्षण मिळाले होते, त्या प्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश देण्यात यावेत. आणि जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातून आरक्षण कायम होत नाही तोपर्यंत, कोणत्याही प्रकारची नोकर भरती काढू नये. सध्याच्या परिस्थितीत नोकर भरती केली, तर त्याविरोधात समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द टिकवून ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. आपण समाजाची भावना लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्याल अशी अपेक्षा.”, अशा आशयाचे पत्र संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना लिहले आहे.