विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांसह २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

मुंबई नगरी टीम

मुंबई : अंकुश सुरवडे या २८ वर्षीय तरूणाच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याच्या पार्श्वभूमीवर  सायन रूग्णालयातील गलथान कारभाराविरुद्ध विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह भाजपचे आमदार आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर दरेकर यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गेल्या शनिवारी अपघातात जखमी होऊन मृत झालेल्या अंकुश सुरवडे या २८ वर्षीय तरूणाचा मृतदेह रुग्णालयाने भलत्याच लोकांच्या ताब्यात दिल्याने मृतदेहांची अदलाबदल झाली.तसेच अंकुशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. यामुळे अंकुशच्या नातेवाईकांनी रुग्णालयात हंगामा केला.सायन रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे युवकाला आपला जीव गमवावा लागला.त्यामुळे रुग्णालयाच्या बेजबाबदार कारभाराविरुध्द विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा,आमदार कॅप्टन तामिल सेल्वन, आमदार कालिदास कोळंबकर,भाजप जिल्हाधक्ष्य राजेश शिरवाडकर आदी सहभागी झाले होते.

या आंदोलनामुळे विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायन रुग्णालयासमोरील मुख्य रस्त्यावर अचानकपणे केलेल्या आंदोलनाचामुळे कलम १८८ अंतर्गत जमावबंदी आदेश धुडकावणे, कलम २६९ अंतर्गत संसर्जन्य आजार फैलावण्यास कारणीभूत ठरणे आणि कलम ३४१ अंतर्गत बेकायदेशीररित्या प्रवेश करणे या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच आमदार तमिळ सेलव्हन, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा,नगरसेवक राजेश शिरवाडकर यांच्यासह जवळपास २० ते २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleमी केले तर राष्ट्रविरोधी मुख्यमंत्र्यांनी केले तर देशभक्ती का ?, जलील यांचा सवाल
Next articleपोलीस भरती थांबवा; संभाजीराजे भोसलेंची मागणी