…आणि राष्ट्रवादी महिला आघाडीने पंतप्रधान मोदींना पाठवले कांदे

मुंबई नगरी टीम

पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. आज पुण्यात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून केंद्राच्या या निर्णयाविरोधात आंदोलन पुकराण्यात आले. इतकंच नव्हे तर महिला आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोस्टाने कांदे पाठवून निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी, असे निवेदन दिले आहे. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भेटावे, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात आज पुणे सिटी पोस्ट ऑफिसजवळ आंदोलन करण्यात आले.रुपाली चाकणकर यांनी  सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. “जगभरात टाळेबंदी असताना,गारपीट, पाणी टंचाई,दुष्काळ, रोगराई या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत, अनेक आव्हानांचा सामना करीत शेतकरी वर्गाने कांदा उत्पादन घेतले. चार पैसे हातात मिळतील असे वाटत असतानाच लहरी केंद्र सरकारने तातडीने कांदा निर्यात बंदी बाबत निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतकरी उध्वस्त होत आहे. मुंबई जवळील उरण बंदरावर ५ लाख मेट्रिक टन कांदा पडून आहे.जवळपास साडेबाराशे कोटींची उलाढाल थांबली आहे. हा कांदा खराब झाला तर याला जबाबदार कोण?”, असा प्रश्न रुपाली चाकणकर यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी वल्गना करतात, त्याचवेळी शेतकरी विरोधात निर्णय घेतात. मग शेतकरी कसा आत्मनिर्भर होणार ? असाही सवाल त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देखील यावेळी निवेदन देण्यात आले. तर अभिनेत्री कंगना राणावत आणि राज्यापालांच्या भेटीवरून यावेळी टोलाही लागवण्यात आला. राज्यपालांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलिस व महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना चर्चेसाठी वेळ दिली. तशीच वेळ माझ्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना द्यावी व त्यांच्या अडचणी केंद्रापर्यंत पोहचवाव्यात, अशी विनंती यावेळी रुपाली चाकणकर यांनी केली.

Previous articleट्रेंड झालेल्या हॅशटॅगवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची नाराजी
Next article…अन्यथा राजकारणाला रामराम ठोकणार : खा. उदयनराजे भोसलेंचा इशारा