मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यपालांनी राज ठकरे यांना शरद पवारांना भेटायला सांगितले. याचा अर्थ महाविकास आघाडी सरकार शरद पवार चालवतात असा घेऊ नये, असे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. राज्यपालांनी पवारांना भेटण्याचा सल्ला दिल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य शरद पवार चालवत असून उद्धव ठाकरेंना भेटून काय उपयोग, अशी बोचरी टीका केली आहे. त्यामुळे आता उदय सामंत यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.
यावर अधिक बोलताना उदय सामंत म्हणाले, राज्यपालांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पवार साहेबांना का भेटायला सांगितले हे त्यांनाच माहित. त्या दोघांमध्येही काय चर्चा झाली हे मला माहित नाही. त्यामुळे त्यावर बोलणे योग्य नाही. त्यांच्या वक्तव्याचे आपण लावू तसे वेगवेगळे अर्थ लागू शकतात. पंरतु महाराष्ट्राला माहित आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन पक्षांची आघाडी आहे. त्यामुळे शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याही चर्चा करून उद्धव ठाकरे सरकार चालवतात. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे सरकार काम करत आहे आणि ते सर्वांना मान्य असल्याचे उदय सामंत यावेळी म्हणाले.
यासह राज ठाकर यांनी वाढीव वीज बिलांसंदर्भात सरकारवर टीका केली. त्यावरही बोलताना उदय सामंत म्हणाले, प्रत्येकाच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी शिवसेना बांधील नाही. मुख्यमंत्री अशा टीकेकडे लक्ष देत नाहीत. वाढीव वीज बिलांसंदर्भात सरकार संवेदनशील असून मुख्यमंत्री लवकरच यावर निर्णय घेतील, असे उदय सामंत म्हणाले. दरम्यान, आज राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत वाढीव वीज बिलांच्या विषयावर चर्चा केली. यावेळी कोश्यारी यांनी शरद पवार यांना भेटण्याचा सल्ला दिला. तर आपण शरद पवार यांच्याशी फोनवरून किंवा प्रत्यक्षात भेटून संवाद साधू. तसेच वेळ आली तर मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेऊ, असे राज ठाकरे म्हणाले.