मुंबई नगरी टीम
अहमदनगर : महाराष्ट्रात शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले. यावरून आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.शिवसेनेने दिलेला स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता असू शकते असा दावा भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. तसेच सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले असल्याची कडवी टीकाही त्यांनी केली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील हे अहमदनगरच्या जिल्हाधिका-यांना भेटण्यासाठी आले होते.यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरेंवर तोफ डागली.शिवसेनेचा स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता दिसत आहे. महाविकास आघाडीत का बेबनाव झाला? तो का वाढत आहे? स्वबळाचा नारा का दिला जात आहे?, असे प्रश्न विखे पाटलांनी उपस्थित केले. राज्यातील जनतेसाठी नव्हे तर मुठभर लोकांना सत्ता टिकवण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सूरू आहेत. स्वबळाचा नारा द्या, हिंदुत्व सोडा काही फरक पडत नाही, अशी भूमिका तिन्ही पक्षांनी घेतली असल्याची टीका त्यांनी केली.
दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला होता. यावर बोलताना विखे म्हणाले, शिवसेनेने सत्ता टिकवण्यासाठी सर्व मुद्दे सोडून दिले आहेत. हिंदुत्वही सोडले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली, असे समर्थन केले होते. मात्र आज शिवसेनेने सत्तेसाठी सर्व तत्वे गुंडाळली आहेत. केंद्र सरकारवर सातत्याने टीका करणे म्हणजे स्वतःचे अपयश झाकायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे असा प्रकार सूरू असल्याचे विखे पाटील म्हणाले. जर तुमच्यात राज्य चालवायची धमक नाही तर मग केंद्राकडे बोट का दाखवता, असा प्रश्नही त्यांनी केला.यासह मंदिरे उडण्याच्या मुद्द्यावरही विखे पाटील आक्रमक झालेले पाहायला मिळाले. मंदिरे उघडण्यासाठी सरकार का घाबरत आहे याचे आश्चर्य वाटते. यांना परमेश्वराची एवढी भीती का वाटते? मंदिरालय उघडण्याची परवानगी दिली. मात्र मंदिरे अजून बंद आहेत. मंदिरांचा मुद्दा हा केवळ भावनिक नसून अनेकांचे रोजगार गेले आहेत. व्यवसाय उध्वस्त झाले आहेत. याचा विचार सरकारने करायला हवा, असेही पाटील यावेळी म्हणाले.