मुंबई नगरी टीम
मुंबई : महाविकास आघाडीने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावाची यादी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली. यावर आता राज्यपालांची संमती येणे बाकी आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांवर आमचे प्रेम आहे आणि त्यांचेही आमच्यावर प्रेम आहे. त्यामुळे ते १२ सदस्यांची नावे नाकारणार नाहीत, असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या स्पष्टवक्ता असून त्यांचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मंत्रिमंडळात प्रस्तावित करण्यात आलेली १२ सदस्यांच्या नावाची याची राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. महाविकास आघाडीने दिलेली ही नावे राज्यपाल स्वीकारणार का? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात फिरत आहे. मात्र राज्यपाल हे सुज्ञ आहेत.राज्यपाल आणि आमचे एकमेकांवर प्रेम आहे. हे प्रमे किती आहे हे देशाला माहिती आहे. या प्रेमातून यापुढे सर्व कारभार सुरळीत होईल, असे संजय राऊत यांनी म्हटले. राज्यपालांचा आम्ही नेहमी आदर करतो. ते घटनाबाह्य काम करणार नाहीत. १२ सदस्यांची नावे ते नाकारणार नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.
राज्य सरकारने घटनेच्या आधारेच यादी पाठवली आहे. राज्य सरकारने कधीही घटनाबाह्य काम केलेले नाही आणि करणारही नाही. सर्व पक्षांच्या एकमतानेच ही यादी राज्यपालांना पाठवण्यात आली आहे. राज्यपालांच्या निर्णयाचे आम्ही आदर करतो. अखेर मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे पालन राज्यपालांना करावे लागते, अशी भूमिका संजय राऊत यांनी स्पष्ट केली. दरम्यान, महाविकास आघाडी आणि राज्यापाल यांचे ऋणानुबंध बंध हे सुरुवातीपासूनच कसे आहेत, हे सबंध राज्याने पाहिले. त्यातही गेल्या महिन्यात मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात रंगलेला शाब्दिक वादही सर्वांनी पाहिला होता. या घडामोडींनंतर शिवसेना आता प्रेमाची भाषा करत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या या प्रेमाखातर राज्यपाल 12 सदस्यांच्या नावांना मंजुरी देणार हे का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महाविकास आघाडीकडून राज्यपालांना देण्यात आलेली १२ नावे
राष्ट्रवादी काँग्रेस
एकनाथ खडसे (समाजसेवा आणि सहकार)
राजू शेट्टी (सहकार आणि समाजसेवा)
यशपाल भिंगे (साहित्य)
आनंद शिंदे (कला)
काँग्रेस
रजनी पाटील (समाजसेवा आणि सहकार)
सचिन सावंत (समाजसेवा आणि सहकार)
मुझफ्फर हुसेन (समाजसेवा)
अनिरुद्ध वनकर (कला)
शिवसेना
उर्मिला मातोंडकर (कला)
नितीन बानगुडे पाटील
विजय करंजकर
चंद्रकांत रघुवंशी