‘नॉटी’ पुरुषांचे विचार महाराष्ट्रातून स्वच्छ करण्यास मदत करा,मिसेस फडणवीसांचा राऊतांना चिमटा

मुंबई नगरी टीम

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या राजकारणापासून दूर असल्या तरी त्या याबाबत अनेकदा टिप्पणी करताना दिसतात. तसेच त्या देशातील इतर मुद्द्यांवरही भाष्य करत आपले मत व्यक्त करतात. आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने ट्विट करत अमृता फडणवीस यांनी बोचऱ्या शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांना चिमटा काढला आहे. मात्र अमृता यांनी संजय राऊतांचे नाव घेणे टाळत ‘नॉटी’ हा शब्दोच्चार केला आहे.
“आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आणि जागतिक शौचालय दिन देखील आहे. यानिमित्ताने देशातील सर्व पुरुषांना मी एक सामान्य स्त्री म्हणून आवाहन करते की, तुम्ही सर्व एकत्र होऊन वाईट विचारांच्या काही मोजक्या ‘नॉटी’ पुरुषांच्या आचार विचारांची घाण फ्लश करून महाराष्ट्राला स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करा”, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आमहत्या प्रकरण चर्चेत असताना अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. कंगनावर टीका करताना संजय राऊत यांनी हरामखोर असा शब्दप्रयोग केला होता. कंगना म्हणजे नॉटी गर्ल आहे. तसेच हरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजेच खट्याळ मुलगी आहे, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले होते. त्यावेळीही अमृता फडणवीस यांनी ट्विट करत आम्ही विचार केला त्यापेक्षाही तुम्ही जास्त नॉटी निघालात अशी टीका त्यांच्यावर केली होती. तर आताही अमृता फडणवीस यांनी संजय राऊतांचे नाव घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

Previous articleठाकरे कुटुंबाचा व्यवसाय जमीन खरेदीचा की इमारती बांधण्याचा ?
Next article…अन्यथा सोमवारी राज्यभर तीव्र आंदोलन करणार, मनसेचा सरकारला अल्टिमेटम