मुंबई नगरी टीम
मुंबई : वाढीव वीज बिलांच्या मुद्दयावरून भाजप ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता ठाकरे सरकारच भाजपला शॉक देण्याच्या तयारीत आहेत.तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची चौकशी होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज बिल सवलतीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले असल्याचे समजते.
गुरूवारी पार पडलेल्या बैठकीत वाढीव वीज बिल सवलतीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातील वीज बिलांची थकबाकी कशी वाढली यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान, बुधवारी उर्जामंत्री नितीन राऊत यांनी संपूर्ण आकडेवारीसह थकबाकी कशी वाढली यासंदर्भातील माहिती सादर केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणा-या भाजपच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
कोरोनाच्या काळातील वाढीव वीज बिलांमध्ये सवलत देण्याची मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे. मात्र सरकारने वीज बिल माफी देण्यास साफ नकार दिला असून नागरीकांमध्ये संतापाची भावना आहे. या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रामुख्याने भाजप आणि मनसेने आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या सोमवारपर्यंत वाढीव वीज बिलांसंदर्भात निर्णय न झाल्यास मनसे राज्यभरात आंदोलन करणार आहे. तसेच भाजपकडूनही सोमवारी राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन पुकारण्यात आले आहे.