मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या भाजपवर जोरदार टीकास्त्र डागताना दिसत आहेत. परंतु अजित पवार पहाटेचा शपथविधी विसरले का,अशी आठवण करून देत भाजप नेते निलेश राणेंनी टोला लगावला आहे. मी नाही त्यातला असे दाखवण्यात अजित पवार यशस्वी झाले असून त्या सकाळी ते राजभवनात का आले होते,ते त्यांना विचारा, असा सवालही निलेश राणेंनी केला आहे. ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल चढवला.
“अजितदादा पवार बीजेपीवर अशी टीका करत सुटले जसे पहाटेच्या शपथविधीला त्यांचा डुप्लिकेट आला होता.मानलं पाहिजे अजितदादांना दोन्ही बाजूला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सुद्धा ‘मी नाही त्यातला’ दाखवण्यामध्ये ते यशस्वी झाले.एकदा अजितदादांना विचारा कि ते राजभवनात त्या सकाळी का आले होते ?”, अशी टीका निलेश राणेंनी केली आहे. भाजपचे नेते वारंवार महाविकास आघाडीचे सरकार पडणार असे दावे करत असतात. यावर अजित पवारांनीही त्यांच्याच भाषेत उत्तर देत कार्यकर्ते सोबत राहण्यासाठी, आमदारांमध्ये चलबिचल न होण्यासाठी त्यांना खुश ठेवण्यासाठी सारखी गाजरे दाखवावी लागतात. ते १०५ असताना त्यांना सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळालेली नाही हे त्यांचे खरे दुखणे आहे, असा सणसणीत टोलाही अजित पवारांनी लगावला होता.
त्यामुळे अजित पवार करत असलेल्या या टीकेवर निलेश राणेंनी भाजपसोबत त्यांनी काही काळासाठी केलेल्या युतीची आठवण करून दिली. अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे एक वर्षानंतर पुन्हा या आठवणींना उजाळा देण्यात आला होता. दरम्यान, भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.