सुडाला सुडाने नव्हे तर वैचारिक उत्तर देण्याची आवश्यकता, दरेकरांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

मुंबई नगरी टीम

नागपूर : राजकारणात प्रत्येकजण हा लढणारा कार्यकर्ता असतो. प्रत्येक जण सुडाचा बदला सुडाने घेऊ शकतो. पण सुडाला सुडाने उत्तर देऊ असे म्हणण्यापेक्षा सुडाला वैचारिक उत्तर देण्याची आवश्यकता आहे,असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.आमच्यावर सूड उगवलात तर आम्ही दहा सूड काढू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले असल्याचे सांगत दरेकरांनी त्यावर उत्तर पलटवार केला आहे.

प्रवीण दरेकर आज नागपूरात आले होते. संविधान दिनाच्या निमित्ताने त्यांनी भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. एखादी कारवाई झाली असेल तर त्यावर चर्चा केली जाऊ शकते. पण संविधान दिनाच्या वेळीच अशाप्रकारे वक्तव्य केल्याने मुख्यमंत्र्यांनी लोकशाही आणि संविधानाचा अपमान केला आहे, असे ते म्हणाले. तसेच आम्हाला सरकार पाडण्याची घाई नाही. या संदर्भात आमच्या पक्षाने भूमिका स्पष्ट केल्याचेही प्रवीण दरेकर म्हणाले. दरम्यान, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर महाविकास आघाडीतील बरेच नेते आक्रमक झाले आहेत. भाजपच्या दबावामुळे सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानावरून दरेकरांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये अंतर्गत विसंवाद मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या सरकारलाच सत्ता जाण्याची भीती वाटते. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात प्रचंड आक्रोश आहे म्हणून ते भयाने पछाडले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेना खासदार आणि सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. त्याचा प्रोमो आज संजय राऊत यांनी शेअर केला असून ही मुलाखत २७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी कोरोना स्थिती, सरकार समोरील आव्हाने आणि भाजपकडून केल्या जाण्या टीकेवर भाष्य केले आहे. त्यामुळे या मुलाखतीबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Previous articleअजितदादा पहाटेच्या शपथविधीला तुमचा डुप्लिकेट आला होता का ?
Next articleटाळ्या,थाळ्या वाजवून कोरोना अधिक वाढला : जयंत पाटील