टाळ्या,थाळ्या वाजवून कोरोना अधिक वाढला : जयंत पाटील

मुंबई नगरी टीम

मुंबई : पदवीधर-शिक्षक निवडणुकीचा प्रचार रंगात आला असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना काळातही विरोधकांकडून केलेल्या जाणाऱ्या राजकारणावर महाविकास आघाडीचे नेते सडकून टीका करताना दिसत आहेत. टाळी, थाळी, वाजवून, दिवे लावून देशातील कोरोना गेला नाही तर उलट वाढला. पंतप्रधानांच्या निर्णयानुसार आपण जे जे केले त्याने कोरोनाचा प्रसार अधिक वाढल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमदेवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी जयंत पाटील आले होते.

यावेळी आयोजित पदवीधर व कार्यकर्ता जिल्हा मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झाला नसून त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र विविध मुद्द्यांवरून विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनामुळे कोरोनाचा प्रसार अधिक होण्यास भर पडत आहे. पंतप्रधानांनी केलेल्या सूचनेनुसार टाळया, थाळ्या वाजवून दिवे लावून कोरोना गेला नाही उलट वाढल्याचा दावा जयंत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आणि सरकारचा निषेध करणाऱ्या भाजपने कोरोनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, असा सल्लाही जयंत पाटील यांनी दिला.

विरोधकांनाही कितीही राजकारण केले तरी राज्य सरकार याकडे फारसे लक्ष न देता उपाययोजना करून सामान्यांना दिलासा देण्याचे काम करत आहे, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सतीश चव्हाण यांनी दोन्ही कार्यकाळात पदवीधरांचे प्रश्न मांडण्यात आघाडी घेतली आहे. नीट परीक्षा केंद्र सुरू करणे असो, विनाअनुदानित शाळांचे प्रश्न, महापरीक्षा पोर्टल बंद करणे यांसारख्या इतर प्रश्नांवर त्यांनी सभागृत भूमिका मांडली. त्यामुळे सतीश चव्हाण हे मोठ्या मताधिक्यानी विजयी होतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Previous articleसुडाला सुडाने नव्हे तर वैचारिक उत्तर देण्याची आवश्यकता, दरेकरांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
Next articleपोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी जे जे करणे शक्य आहे ते सर्व करणारच