मुंबई नगरी टीम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालची मुलाखतीतील भाषा म्हणजे अशी भांडणे नाक्यावर होतात.वर्षपूर्तीच्या निमित्ताने होत नाही,असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला.मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची नाही,इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी कधी पाहिले नव्हते, ते संविधानाची शपथ सुद्धा विसरले ,अशी जळजळीत टीकाही त्यांनी केली.महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीवरून आता भाजपने ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवण्यास सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी पत्रकार परिषद पार पाडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवरून टीकास्त्र डागले. शिवाय वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारच्या कामाचा लेखाजोखाही मांडला.पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेत्री कंगना राणावत आणि पत्रकार अर्णब गोस्वामी प्रकरणावर भाष्य केले. राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या कार्यकाळाची प्रगती पुस्तिका म्हणजे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने काल दिलेले निकाल आहेत. सरकारी तंत्राचा मोठा गैरवापर केला गेला असून ही दमनकारी नीती असल्याची टीका त्यांनी केली. तर या निकालानंतर कुणावर कारवाई करणार हे स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावत धमकी वजा इशाराच दिला होता.यावरही देवेंद्र फडणवीस म्हणतात की,मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीत वर्षपूर्तीचा आढावा हवा होता,पुढची दिशा काय यावर त्यांना काहीच सांगता आले नाही. मुलाखतीत केवळ धमक्या दिसल्या. इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी कधीही पाहिले नव्हते. हात धुवून मागे लागू, खिचडी शिजवू ही कोणती भाषा? तुम्ही संविधानिक पदावर आहेत, अशी भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली. विकासाच्या मुद्द्यावर अजिबात भाष्य न करता धमकीची भाषा वापरण्यात आली. खरे तर मुख्यमंत्र्यांची ही मुलखात प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची देखील नाही, असेही ते म्हणाले.
कोणत्याही घटकाचे समाधान हे सरकार करू शकले नाही
स्थगिती पलिकडे या सरकारकडे दाखवण्यासारखे काही नाही.आरे कारशेडवर स्थगिती हा निर्णय मुंबईकरांवर अन्याय करणारा आहे.देशात सर्वाधिक रुग्ण,सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात आहेत. रस्त्यावर मृत्यू, बाथरूममध्ये १५ दिवस मृतदेह पडून. इतके भीषण वास्तव असताना हे म्हणतात कोरोनाची स्थिती उत्तम हाताळली,असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी न दिलेले वचन यांच्या लक्षात राहते, पण शेतकऱ्यांना २५ हजार आणि ५० हजार मदतीचे वचन का लक्षात राहत नाही? शेतकऱ्यांना कवडीचीही मदत या सरकारने दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मराठा आरक्षणाचाही मोठा घोळ केला. सर्वोच्च न्यायालयात वकील हजर राहत नाही.त्यात विद्यार्थ्याचे अतोनात हाल झाले असेही ते म्हणाले.
आम्ही हा कायदा करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे सुनिश्चित केले होते, असे फडणवीस यांनी स्पष्ट करत कोणत्याही घटकाचे समाधान हे सरकार करू शकले नाही, अशी टीका त्यांनी केली.त्यांच्या या कार्यकाळाची प्रगती पुस्तिका म्हणजे काल सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने दिलेले दोन निकाल असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावतानाच,हे दोन निकाल आल्यावर आता कुणावर कारवाई करणार हे आता स्पष्ट झाले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.त्यांनी सरकारी तंत्राचा मोठाच गैरवापर केला गेला असून,ही दमनकारी नीति असल्याचा आरोपही त्यांनी केला.हे सरकार कोणत्याही घटकाचे समाधान हे सरकार करू शकले नसून,या तिन्हीही पक्षात कोणताही समन्वय नाही.आमच्या कितीही तक्रारी केल्या तरी जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करीत राहू, कारण हे सरकार नाकर्ते आहे आणि जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जागे करणे, हे आमचे काम आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.ते कितीही एकत्र आले तरी त्यांचे सरकार कसे चालले आहे, हे जनतेने पाहिले आहे.राजकारणात एक अधिक एक म्हणजे शून्य सुद्धा होतात असे सांगतानाच,भाजपाचे हिंदूत्व बदललेले नाही.पण हिंदूत्व जर तुमच्या धमण्यांमध्ये वाहतं तर कुणासोबत मांडीला मांडी लावून बसता ? वीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांसोबत ? असे सांगून शिवसेनेने आता हिंदूत्व सोडले आहे असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.कुछ लोगों को सीख नहीं मिलती! उनसे अपेक्षा क्या करना अशी असा टोलाही त्यांनी शेवटी लगावला.