हिवाळी अधिवेशन दोन दिवसाचे,सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याची फडणवीसांची टीका

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबईत होणा-या हिवाळी अधिवेशनालाही कोरोनाचा फटका बसला आहे.नागपूर ऐवजी मुंबईत होणारे अधिवेशन केवळ दोनच दिवस चालणार आहे.हे अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर असे दोन होणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे.आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.तर सत्ताधा-यांच्या या निर्णयावर विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.

कोरोना संकटामुळे नागपूरात होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.या अधिवेशनाच्या कामकाजाचा कालावधी ठरविण्यासाठी आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हे अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय झाला.राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे घेण्यात आले होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अधिवेशन केवळ दोन दिवस घेतले जाणार आहे.यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले आहे.चर्चेपासून पळ काढण्यासाठी दोन दिवसाचे अधिवेशन घेतले जात आहे, अशी टीका त्यांनी केली. दोन दिवसांऐवजी किमान दोन आठवडे अधिवेशन व्हावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.राज्य सरकारने पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलले आहे. त्याहून गंभीर म्हणजे १४ आणि १५ तारखेला केवळ दोनच दिवस अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसमोर अभूतपूर्व संकटे आहेत.पावसाने,पुराने,अतिवृष्टीने, चक्रीवादळाने आणि त्यानंतर रोगराईने पूर्णपणे शेती नष्ट झालेली आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील कापूस आणि सोयाबीन बोंडअळीमुळे नष्ट झालेला आहे”, अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.

शिवाय मराठा आरक्षणाचा देखील विषय आहे.ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे. महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत देखील वाढ झालेली आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाकडून सरकारला चपराक बसत आहे. या विषयांवर चर्चा करण्यासाठी विधानभवन हे महत्त्वाचे स्थान आहे. मात्र सरकारकडून दोन दिवसांचे अधिवेशन घेऊन चर्चेपासून पळ काढला जात आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.किमान दोन आठवड्यांचे अधिवेशन व्हावे,अशी आमची मागणी होती.पंरतु सरकार दोन दिवसांचे अधिवेशन घेणार असून आमचा त्याला विरोध असल्याची ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

Previous articleधुळे-नंदुरबारचा निकाल हा उद्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट करणारा : प्रवीण दरेकर
Next articleबीएचआर घोटाळा प्रकरणी माजी मंत्री गिरीश महाजनांनी साधला खडसेंवर निशाणा