धुळे-नंदुरबारचा निकाल हा उद्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट करणारा : प्रवीण दरेकर

मुंबई नगरी टीम

मुंबई : धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अमरीश पटेल यांचा एकतर्फी विजय झाला आहे. अमरीश पटेल यांनी ३३२ मते मिळवून महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांचा पराभव केला. तर अभिजित पाटील याना ९८ मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे महाविकास आघाडीची मते मोठ्या प्रमाणात फुटल्याचे पाहायला मिळाले. यावरून भाजपने महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. हा निकाल उद्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट करणारा असल्याचा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे.

धुळे-नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीची मिळून २१३ मते होती. मात्र आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना केवळ ९८ मते मिळाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेते आमच्यात विसंवाद नाही, असा कितीही दावा करत असले तरी तसे नाही हे समोर आले असल्याची प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. इथल्या मतदारांनी महाविकास आघाडीचा आदेश पाळला नाही. त्यामुळे हा निकाल उद्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट करणारा आहे, असे विधान त्यांनी केले. शिवाय ठाकरे सरकारचे भविष्य काय असेल हे आज स्पष्ट झाल्याचा टोलाही दरेकरांनी लगावला आहे.

या पोटनिवडणुकीत भाजपच्या १९९ तर महाविकास आघाडीच्या २१३ मतदारांनी मतदान केले होते. अमरीश पटेल विरोधकांची ११५ मते फोडण्यात यशस्वी झाले. काँग्रेसच्या जवळपास ५७ मतदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे स्पष्ट झाले आहे. तर काँग्रेसचे संख्याबळ १५७ असताना देखील आघाडीचे उमदेवार अभिजित पटेल यांना केवळ ९८ मते मिळाली आहेत. तसेच महाविकास आघाडीच्या किमान ११५ मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले आहे. त्यामुळे आघाडीच्या उमदेवराला मिळालेल्या इतक्या कमी मताधिक्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Previous articleसुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का ? शरद पवारांनी केले मोठे विधान
Next articleहिवाळी अधिवेशन दोन दिवसाचे,सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याची फडणवीसांची टीका