टीका करणार नाही असे म्हणणा-या दीपक केसरकरांची थेट उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे.त्याच्यावर आम्ही टीका करणार नाही आणि टीका सहनही करणार नाही अशी भूमिका घेणारे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आता थेट उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सुरवात केली आहे.महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात दिल्लीवर आरोप करण्यात येत होते.आता हे राजकारण थांबलं पाहिजे, असा थेट इशारा त्यांनी शिवसेनेला दिला आहे.

हातकणंगलेचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला.या विरोधात खासदार माने यांच्या कोल्हापूरच्या घरावर शिवसैनिकांनी मोर्चा काढला होता.यावरून केसरकर यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे.आमच्या सोबत आलेल्या खासदरांच्या घरांवर मोर्चे काढून त्यांना जाब विचारला जात आहे.लोकांना भडकवलं जात आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता.मात्र तो त्यांनी पूर्ण केला नाही.केंद्रातील सरकार बरोबर चांगले संबंध ठेवले असते राज्याचा विकास झाला असता.पण सेनेचे प्रवक्ते दररोज सकाळी उठून केंद्रावर निशाणा साधत राहिले.त्याच कारणामुळे केंद्र सरकारसोबतचे संबंध बिघडले.गेली अडीच केंद्रावर आरोप करण्याचे राजकारण सुरू होते.आता हे राजकारण थांबले पाहिजे.केंद्र आणि राज्य सरकारचे संबंध चांगले राहिले तर राज्याचा गाडा सुरळीत चालू शकतो असेही ते म्हणाले.

आम्ही आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी केली होती.हे कोणतेही कट कारस्थान नव्हते.शिवाय तत्कालीन मुख्यमंत्री आजारी असताना हे कट कारस्थान झाले नाही.गेल्या अडीच वर्षात कुठेही कुठेही न फिरणारे आता राज्यभर फिरू लागले आहेत अशा शब्दात नाव न घेता त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.आज राज्याला शांतता हवी आहे. ती लोकांना आणि राज्याला समृद्धीकडे घेऊन जाईल.कालपर्यंत तुम्ही सांगत होता की लोकांच्या बांधापर्यंत चला. मात्र, आता आपल्या कार्यकर्त्यांना बांधापर्यंत जायला सांगून त्यांना पंचनाम्यामध्ये मदत करायला का सांगत नाही असा टोलाही त्यांनी लगावला. खासदारांच्या घरावर मोर्चा काढण्या पेक्षा सभा घ्या, राज्यातील जनतेशी बोला असे सांगतानाच, कुणाच्या घरावर चाल करून जाणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असेही केसरकर यावेळी म्हणाले.

Previous articleदिल्लीतून हिरवा झेंडा मिळत नाही तोपर्यंत हे दोघे काय करतील असे वाटत नाही !
Next articleघाईघाईत घेतलेल्या चुकीच्या निर्णयांना स्थगिती,जनतेशी संबंधित कामांना स्थगिती नाही