मुंबई नगरी टीम
मुंबई: महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची विचारधारा वेगवेगळी असली तरी जनहित हा आमचा समान कार्यक्रम असून,जोपर्यंत उद्धव ठाकरे,शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या मनात महाविकास आघाडी सरकार चालवायचे हा निर्धार आहे तोपर्यंत या सरकारला कोणताही धोका नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केले.
महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ण झाले आहे.त्यानिमित्ताने आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते “महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री उपस्थित होते.त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची विचारधारा वेगवेगळी असली तरी जनहित हा आमचा समान कार्यक्रम आहेत.जोपर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या मनात महाविकासआघाडी सरकार चालवायचे हा निर्धार आहे तोपर्यंत या सरकारला कोणताही धोका नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोरोनाच्या संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा इतका अभ्यास केला की ते आता जवळपास अर्धे डॉक्टरच झाले आहेत.मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली पण कोरोना त्यांच्यापाशी फिरकलाच नाही,अशी मिश्किल टिप्पणीही उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. या कार्यक्रमात अजित पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुक्तकंठाने तारीफ केली.मुख्यमंत्री ठाकरे यांनी गेल्या वर्षभरात आपल्या कामाचा ठसा उमटवून दाखवला असून,नागरिक आणि प्रशासनात संघभावना निर्माण केली.दुसरीकडे त्यांनी अधिकाऱ्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य दिले. हे सगळे करत असताना त्यांनी पुढाकार घेत,माझे कुटुंब, माझी जबाबदारी, ही मोहीमही राबवली.त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहण्यास मदत झाली, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेही कौतुक केले.मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री टोपे या दोघांनी कोरोनाची औषधे,इंजेक्शन्स याचा इतका अभ्यास केलाय की दोघेही अर्धे डॉक्टर झाले आहेत असे पवार म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय केले पाहिजे,कसे केले पाहिजे, याचा सतत अभ्यास या दोन्ही नेत्यांकडून सुरु होता.त्यामुळे आम्हाला सगळ्यांना कोरोना झाला तरी त्यांच्यापाशी मात्र कोरोना फिरकलाच नाही, अशी टिप्पणी पवार यांनी केली.