मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देत विविध विचारसरणींच्या तीन पक्षांना एकत्रित आणण्याचा अनोखा प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करून दाखवला.असाच प्रयोग आता शरद पवार यांनी राष्ट्रीय स्तरावर देखील करावा,अशी मागणी काँग्रेसकडून केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.येत्या काळात शरद पवार यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपद येण्याची शक्यता आहे.इतकेच नव्हे तर शरद पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याचीही काँग्रेसची तयारी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे केवळ राज्याच्याच नव्हे तर देशपातळीवरील राजकारणात ही मोठी घडामोड ठरू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासारखी महाविकास आघाडी केंद्रीय स्तरावर करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी यासंदर्भातील प्रस्ताव पवारांना दिला असल्याची माहिती आहे.त्यानुसार विरोधी पक्षाला एकत्र करुन आगामी लोकसभा निवडणुकीचे नेतृत्व शरद पवारांनी करावे, असा प्रस्ताव काँग्रेसने दिला आहे.काँग्रेस आणि युपीएचे नेतृत्व सोनिया गांधी यांच्यानंतर कोणाकडे द्यावे,याबाबत गेल्या काही दिवसांत धुसफूस सुरू होती.बिहार विधानसभा आणि हैदराबाद महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर यूपीएच्या अध्यक्षपदावरून पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत.तर यूपीएचे नेतृत्व शरद पवारांकडे सोपवण्याची मागणी असल्याचे समोर येत आहे.
सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी यूपीएची धुरा सांभाळतील अशी चर्चा होती.मात्र त्यांनी यासाठी नकार दिल्याची माहिती मिळत आहे.त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर प्रभावी असे नेतृत्व म्हणून शरद पवार यांचे नाव पुढे केले जात आहे.शिवाय आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात शरद पवार यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची तयारीही काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष करत आहेत,अशी माहिती विरोधीपक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली. दरम्यान,आगामी लोकसभा निवडणुका २०२३ मध्ये होणार असल्या तरी काँग्रेस आतापासूनच तयारीला लागली आहे. त्यामुळे युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी शरद पवारांकडे येणार का? आणि त्यावर ते काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.